मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, कन्व्हेंशन केंद्र कागदावरच | पुढारी

मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, कन्व्हेंशन केंद्र कागदावरच

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : पुण्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचविणारा, जिल्ह्यासाठीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी व आशिया खंडातील सर्वात मोठे मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्राचे गेले दहा वर्षे केवळ कागदावरच नियोजन सुरू आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे हा प्रकल्प आल्यानंतर खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले असले तरी अद्यापही प्रकल्पाला अपेक्षित गती दिली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. मोशी येथे तब्बल 240 एकरांवर आशिया खंडातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र उभारण्यात येणार आहे. शासनाने सन 2012 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. प्राधिकरणाने तयार केलेल्या प्रकल्पाच्या विकास आराखड्याला शासनाने मान्यतादेखील दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर हा प्रकल्प पीएमआरडीएकडे वर्ग करण्यात आला.

यामध्ये तब्बल 24 एकरमध्ये खुले प्रदर्शन केंद्र व तब्बल साडेआठ एकरवर तीन बंदिस्त हॉल उभारण्यात येणार आहेत. याशिवाय तब्बल 5 हजार लोकांची आसन क्षमता असणारे कन्व्हेंशन सेंटर, संग्रहालय, अग्निशमन केंद्र, प्रशासकीय इमारत, व्हीआयपी लाउंज, बस डेपो, बहुस्तरीय कार पार्क, व्यापारी केंद्र, हॅलीपॅड, मेट्रो स्टेशन, पंचतारांकित व बजेट हॉटेल, प्राथमिक शाळा, दवाखाने असा मोशी आणि परिसराचा चेहरामोहराच बदलून टाकणारा हा प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोशीसह लगतच्या परिसराला प्रचंड महत्त्व प्राप्त होणार आहे. परंतु गेले दहा वर्षांपासून खुल्या प्रदर्शनाची काही कामे सोडली तर प्रकल्प केवळ कागदावरच राहिला आहे.

पीएमआरडीएकडे हा प्रकल्प आल्यानंतर गेल्या दीड- दोन वर्षांत प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खुल्या प्रदर्शनाचे काम बर्‍यापैकी पूर्ण करण्यात आले आहे. आता संपूर्ण प्रकल्पासाठी व्यवहार सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत प्रकल्पाच्या कामाला चांगली गती प्राप्त होईल.

                                            -प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता

Back to top button