“यापुढे निवडणूक लढवणार नाही पण भाजप प्रवेश मात्र लवकरच होणार” : एकनाथ खडसेंनी केली घोषणा  | पुढारी

"यापुढे निवडणूक लढवणार नाही पण भाजप प्रवेश मात्र लवकरच होणार" : एकनाथ खडसेंनी केली घोषणा 

मुक्ताईनगर : पुढारी वृत्तसेवा
निवडणूक इच्छा संपल्याने यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी (दि. १२) केली. तथापि, आपण राजकीय निवृत्ती घेतली नसल्याचे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांची आपल्याबद्दलची नाराजी दूर झाल्याचा दावाही खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

भाजप नेते विनोद तावडे यांनी आपला पक्षप्रवेश निश्चित असल्याचे सांगितल्याने मी निश्चिंत असल्याचेही खडसे म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माझ्याबद्दलची नाराजी दूर झाली आहे. या तिघांचा आपल्या भाजप प्रवेशाला विरोध नव्हता, केवळ नाराजीचा भाग होता. ते मळभ दूर झाल्याने मी लवकरच भाजपवासी होईल, असा दावाही त्यांनी केला.

रोहिणीला तिकडे भविष्य दिसतेय
कन्या रोहिणी खडसे यांच्या राजकीय वाटचालीबद्दल विचारले असता खडसे म्हणाले, रोहिणी हिला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत काम करायची इच्छा आहे. तिला तिथे भविष्य दिसत असल्याने तसा तिने निर्णय घेतला आहे. तिने भाजपमध्ये यावे म्हणून मी तिला विचारणा केली. मात्र, ती तिच्या भूमिकेवर ठाम आहे. मी मात्र भाजपचे काम करणार आहे, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.

Back to top button