‘डेस्टिनेशन वेडिंग’ची वाढतेय क्रेझ ; महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळ्याला मिळतेय अधिक पसंती | पुढारी

‘डेस्टिनेशन वेडिंग’ची वाढतेय क्रेझ ; महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळ्याला मिळतेय अधिक पसंती

सुवर्णा चव्हाण  : 

पुणे : लग्नसराईचा सिझन आता सुरू होत असून, तरुण जोडप्यांमध्ये अलीकडे थीमनुसार ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, मुळशी, भूगाव, पानशेत, भोर यांसह केरळ, गोवा, राजस्थान, गुजरातमधील चांगली ठिकाणे हेरून तिथे लग्न लावण्यासही तरुणाई अधिक पसंती देत आहे. त्यासाठी अनेक इव्हेंट कंपन्या कामाला लागल्या असून, लग्नासाठी विविध ठिकाणांवरील हॉटेल्स, कार्यालये बुक केली जात आहेत.  जोडप्यांनी पसंत केलेल्या विविध थीमनुसार डेस्टिनेशन वेडिंग होत असून, हॉलीवूड ते बॉलीवूडपासून ते अरेबियन थीमपर्यंत…अशा थीमनुसार लग्नं केली जात आहेत. सध्या वेगळ्या पद्धतीने आवडत्या थीमनुसार आणि आवडत्या ठिकाणी लग्न करण्यावर तरुण जोडपी भर देत आहेत. आपल्या स्वप्नातील लग्नाला साकार करण्याचे निमित्त ते साधत आहेत.

याविषयी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, ‘सध्याच्या लग्नसराईसाठी बँक्वेट हॉलपासून ते मंगल कार्यालयापर्यंतचे फेब—ुवारीपर्यंतचे बुकिंग झाले असून, केटरिंगपासून ते मंडप व्यावसायिकांपर्यंत… सर्वांना यंदाच्या लग्नसराईत कामे मिळाली असून, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांही कामाला लागल्या आहेत. खासकरून तरुण जोडप्यांच्या लग्नासाठी कंपन्या डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन करीत असून, जोडप्यांना आवडत असलेल्या ठिकाणी आणि त्यांच्या आवडत्या थीमनुसार नियोजन होत आहे. पुण्यात जवळपास असलेल्या 30 ते 35 ठिकाणांमध्ये अशी लग्नं होत आहेत. भूगाव, लोणावळा, मुळशी, पानशेत, भोर, भीमाशंकर यासह महाबळेश्वर आणि पाचगणी येथेही अशी लग्नं होत आहेत.

डेस्टिनेशन वेडिंगचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. त्यानुसार इव्हेंट कंपन्या काम करीत आहेत. जोडप्यांनी सांगितलेल्या थीमप्रमाणे सजावट करण्यापासून ते संगीताच्या कार्यक्रमाच्या नियोजनापर्यंत..केटरिंगपासून ते मेकअपपर्यंतचे सर्व नियोजन ते करीत आहेत. एका लग्नाच्या नियोजनासाठी 20 जणांची टीम काम करते आणि 15 दिवसांची मेहनत करून जोडप्यांचे डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करीत आहेत.
     – निखिल कटारिया, सदस्य, इव्हेंट अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशन

Back to top button