दुष्काळी म्हसोबाच्या वाडीत फुलू लागली रेशीम शेती | पुढारी

दुष्काळी म्हसोबाच्या वाडीत फुलू लागली रेशीम शेती

बाळासाहेब तांबे

शेटफळगढे : सततचे दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या म्हसोबाच्या वाडीमध्ये रेशीम शेती फुलू लागली आहे. गावामध्ये आतापर्यंत साठ शेतकर्‍यांनी रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनीही भेट देऊन येथील शेतकर्‍यांचे कौतुक केले होते. इंदापूर तालुक्यात 202 शेतकर्‍यांनी 213 एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली आहे.

त्यामध्ये एकट्या म्हसोबावाडी गावचे जुन्या 35 आणि नवीन 23 हून अधिक शेतकर्‍यांनी 60 एकरापेक्षा अधिक लागवड केली आहे. कोरोनाकाळात रेशीम शेती अडचणीत आली असतानाही कुठेही शेतकर्‍यांनी हताश न होता आलेल्या संकटाला पाठ दिली होती. आता सर्वाधिक एकरी उत्पन्न त्यांना मिळू लागले आहे. सुमारे दोन ते सात लाख रुपयांपर्यंत एकरी उत्पन्न शेतकर्‍यांना मिळू लागले आहे.

सुरुवातीच्या काळात शेतकर्‍यांना बाजारपेठेची अडचण होती. मात्र, आता जवळच बारामतीला बाजार झाल्याने त्यांची ती अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे. रेशीमचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे गाव म्हणून ओळख असल्याने या गावातच असलेल्या शेडवर व्यापारी स्वतःहून येऊन सातशे रुपये किलोपर्यंत कोष खरेदी करीत आहेत. शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. या गावाला दुष्काळी गाव म्हणून ओळख असल्याने शेतीपासून उत्पन्न मिळत नव्हते.

मात्र, काही शेतकर्‍यांनी यावर शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुती लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील नुकतीच या तुती शेडची पाहणी करून शेतकर्‍यांना मार्गदर्शनही केले होते. या परिसरातील शेतकर्‍यांनी स्वतःच्या रोपवाटिका देखील तयार केल्या आहेत. यामध्ये त्यांचा ’व्ही 1’ या व्हरायटीकडे जास्त प्रमाणात कल आहे.

एक एकरावर तुती लागवड केल्यावर साधारणतः एका बॅचमध्ये अडीशे ते तीनशे किलो कोष मिळतात व चालू बाजारभावामुळे साधारणतः एका बॅचमध्ये दोन लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. वर्षात चांगले वातावरण असल्यास पाच बॅचपर्यंत बॅच घेता येत आहेत.
सध्या तुतीला चांगले दिवस आहेत. मात्र, कोरोनाकाळात अडचण आली होती. त्यावरही आम्ही मात करीत तुतीची शेती फुलवली आहे, असे शेतकरी अमोल चांदगुडे यांनी सांगितले.

रेशीम उद्योगवाढीसाठी शासन अर्थसाहाय्य करीत असून, अल्पभूधारक शेतकर्‍यांना तुती लागवडीसाठी 3 लाख 42 हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. तसेच अधिकची यामध्ये वाढ होण्यासाठी ’सिल्क समग्र 2’ ही नवीन योजना शासनाची आणली आहे.

                                                                   बाळासाहेब माने,
                                                 क्षेत्र सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय

 

Back to top button