पुणे : शालेय सहलींमुळे आता पर्यटनस्थळे गजबजणार | पुढारी

पुणे : शालेय सहलींमुळे आता पर्यटनस्थळे गजबजणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेली दोन वर्षे कोरोनामुळे शालेय सहलींना ब्रेक लागला होता. आता मात्र पुन्हा शालेय सहलींचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे पुन्हा गजबजणार आहेत. त्यासाठी खबरदारी आणि नियमांचे पालन मात्र शाळांना करावे लागणार आहे. सहली काढण्याअगोदर किमान पंधरा दिवस प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी खासगी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना केले आहे.

शिक्षण विभागाने शालेय सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रकच जारी केले आहे. त्यानुसार, समुद्रकिनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढताना विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना गड-किल्ले दाखवण्यात यावेत.

सहलीपूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांनी सहलीबाबत, तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे. सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी वा ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये आणि डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बरोबर असावेत. सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोहोचवावा. त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी. गरज भासल्यास सहलीबरोबर पालकांचा एक प्रतिनिधी पाठवावा.

सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घेणे बंधनकारक आहे. सहलीच्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार घ्यावयाची काळजी, याचे मार्गदर्शन शाळांनी विद्यार्थ्यांना केले पाहिजे. सहलींसाठी फक्त एसटी बसमधूनच सहल घेऊन जाणे गरजेचे आहे. वीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक सहलीबरोबर पाठवावा. विद्यार्थ्यांना एकटे वा नजरेआड फिरण्यास सोडू नये. शिक्षकांनी तंबाखू, गुटखा आणि अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये, असे निर्देश वाखारे यांनी दिले आहेत.

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहली काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. सहलीच्या सर्व बाबी संबंधित अधिकार्‍यांना लेखी कळवाव्या लागणार असून, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी संध्याकाळी परत घरी येतील, अशा बेतानेच सहली आखल्या जाव्यात, अशा प्रकारची खबरदारी आणि नियमांचे पालन करावे लागणार आहे.

विद्यार्थिनींबरोबर गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्या
सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सहलीतील सर्व शिक्षकांची असेल. सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल, तर एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधीबरोबर नेणे बंधनकारक राहील. विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले

Back to top button