‘हायस्ट्रीट’ची वाहतूक समस्या सुटणार कधी? बालेवाडी परिसरातील नागरिकांचा सवाल | पुढारी

‘हायस्ट्रीट’ची वाहतूक समस्या सुटणार कधी? बालेवाडी परिसरातील नागरिकांचा सवाल

बाणेर; पुढारी वृत्तसेवा : बालेवाडी ’हायस्ट्रीट’ परिसरात हॉटेल बार व पबच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील वाहतुकीची समस्या सुटणार तरी कधी? अशा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. ‘बालेवाडी हायस्ट्रीट’वर अनेक मोठे हॉटेल व पब उभारले आहेत. या हॉटेल व्यावसायिकांनी पार्किंगचे नियोजन केले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी येणार्‍या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या कडेला, पदपथावर अस्ताव्यस्त लावलेली पाहावयास मिळतात. या हॉटेल व्यावसायिकांना पार्किंगची व्यवस्था नसतानाही परवानगी कशी देण्यात आली? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

विकेंड पार्ट्यांना तर या ठिकाणी मोठी गर्दी होत असून, वाहतूक पोलिसांनी वारंवार कारवाई करून देखील परिस्थिती ‘जैसे थे’ पाहावयास मिळते. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी काही हॉटेल व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा सध्या परिस्थिती आहे तशीच आहे.

याबाबत परिसरातील नागरिक व संघटना वारंवार तक्रार करून देखील काहीच उपयोग होत नसल्याचे लक्षात येत आहे. पार्किंग व्यवस्थेचे गांभीर्य हे हॉटेल व्यावसायिक कधी घेणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. बाणेर-बालेवाडी पोलिस चौकीतील सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनीही बाणेर बालेवाडी परिसरातील पंचवीस हॉटेलचालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. हॉटेलमधील डीजेचे आवाज कमी ठेवणे, कायदा व सुव्यवस्था पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

मेट्रोच्या कामामुळेही अडथळा
हायस्ट्रीट परिसरामध्ये आधीच मेट्रोच्या कामामुळे रस्ता अडवला गेला असून, हॉटेल व्यावसायिकांच्या वाहनांमुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी वाढली आहे. अतिक्रमण कारवाई करून पोलिस कारवाई करून देखील परिस्थिती ‘जैसे थे’च पाहावयास मिळते. ही समस्या कधी सुटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या परिसरामध्ये वारंवार कारवाई केली जात आहे. संध्याकाळनंतर अनेक कर्मचारीवर्ग बहुतांश वेळा या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी व कारवाईसाठी पाठविला जात आहे. पार्किंगचे अलाउन्सिंग देखील केले जात आहे.

                        – बाबासाहेब कोळी, पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी वाहतूक विभाग

Back to top button