वेल्हे : तरुणीचा मृत्यू; प्रशासन, नातेवाइकांचे दावे-प्रतिदावे | पुढारी

वेल्हे : तरुणीचा मृत्यू; प्रशासन, नातेवाइकांचे दावे-प्रतिदावे

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : कनिष्ठ महाविद्यालयीन तरुणी मयूरी प्रकाश मोरे (वय 17) हिचा मृत्यू गळफास घेऊन झाला आहे, असा दावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे, तर मयूरी हिचा मृत्यू सर्पदंशाने झाला आहे, असे तिच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. रविवारी (दि. 6) ही घटना घडली होती.

याबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी पाठविलेल्या खुलासापत्रात मयूरी हिचा मृत्यू गळफासामुळे झाला आहे, असे ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे, असे म्हटले आहे. पानशेत येथील आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित होते. तेथे तिला उपचारांसाठी नेले नाही, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले, असे देखील डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. 7) सायंकाळी मयूरीच्या पार्थिवावर पानशेत येथे शेकडोंच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. त्या वेळीही तिचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे सांगण्यात आले. मयूरी हिचे नातेवाईक व माजी सरपंच सुनील गायकवाड म्हणाले की, मयूरीला सर्पदंश झाल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यामुळे प्राण वाचविण्यासाठी पानशेत, खानापूर, खडकवासलापासून पुण्यापर्यंत नातेवाइकांनी धावपळ केली. ससून रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला होता.

Back to top button