पिंपरी: घरकुल चौकात वाहतुकीचा बोजवारा! स्पाईन रस्त्याच्या कामातील चुकांचा नागरिकांना मनस्ताप | पुढारी

पिंपरी: घरकुल चौकात वाहतुकीचा बोजवारा! स्पाईन रस्त्याच्या कामातील चुकांचा नागरिकांना मनस्ताप

चिखली : मनपाने घरकुल चौकातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी चौकाचे सुशोभीकरण करत करोडो रुपयांचा खर्च करूनही वाहतूक समस्या ‘जैसे थे’ असल्याची परिस्थिती आहे. स्पाईन रस्त्याच्या कामात या रस्त्यामध्ये येणारे चौक विचारात घेता उड्डाणपूल प्रस्तावित करणे अपेक्षित होते, त्या चुकीचा फटका गेली दहा वर्षे नागरिक भोगत आहेत.त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक समस्या असून,घरकुल चौकात तर वाहतुकीचा बोजवारा झाल्याचे दिसून येत आहे.

भक्ती शक्ती चौक ते जय गणेश साम्राज्य,मोशी या अंदाजे पाच किमी रस्त्याचे काम करत असताना त्या रस्त्याच्या आराखड्यात ज्या भागात चौक आहेत,त्या ठिकाणी भूमिगत सब वे अथवा उड्डाणपूल प्रस्तावित करणे अपेक्षित होते.या रस्त्याच्या अंतर्गत अंदाजे दहा चौक येतात आणि सगळ्या चौकाच्या आसपास तत्कालीन प्राधिकरणाचे क्षेत्र होते.

त्यामुळे भविष्यकालीन नियोजन करून रस्त्याची निर्मिती आवश्यक होती आणि वाहतुकीची समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घेतली जाणे अपेक्षित होते.परंतु त्या वेळी नियोजनात झालेल्या चुकांमुळे आता संपूर्ण स्पाईन रस्ता हा चौकातील रहदारी आणि वाहतूक समस्येने ग्रस्त झाला आहे.त्रिवेणीनगर,कृष्णानगर, घरकुल, जाधववाडी, आरटीओ, स्पाईन मॉल या ठिकाणी असलेल्या चौकांमध्ये वाहतुकीची मोठी समस्या उत्पन्न झालेली आहे.घरकुल चौकात तर सुमारे सहा बाजूंनी वाहतूक येत असल्याने,त्याचे नियोजन आखता आखता पालिकेला आता नाकीनऊ आले आहे. सुमारे शंभर मीटर परिघाच्या चौकात वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चिखली भागात रस्त्याच्या कामांची गरज आहे आणि अशात काही ठिकाणी चुकीचे नियोजन केल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.घरकुल चौकात दरदिवशी वाहतूक कोंडी ही समस्या असून,पालिकेच्या सध्या सुरू असलेल्या कामामुळे समस्या सुटल्यास आनंदच आहे.
-विजय तापकीर, सामाजिक कार्यकर्ता

चिखली भागातील वाहतूक समस्या सुटावी या हिशेबाने घरकुल चौकाचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी वाहतूक सुनियोजित पद्धतीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे.चौकाच्या कामामुळे परिसराची शोभा वाढणार असून,नागरिकांना उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने भाजपने काम केले आहे.
-दिनेश यादव, माजी स्वीकृत सदस्य

Back to top button