ग्रा. पं. सदस्याचेच नाव मतदार यादीतून वगळले; गोगलवाडी येथील घटना | पुढारी

ग्रा. पं. सदस्याचेच नाव मतदार यादीतून वगळले; गोगलवाडी येथील घटना

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठीचा 7 नंबरचा फॉर्म परस्पर भरून हवेली तालुक्यातील गोगलवाडी या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याचेच नाव सध्याच्या मतदान यादीतून वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. गावासह परिसरात यामुळे खळबळ उडाली असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

पुणे जिल्ह्यात येत्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. यासंदर्भात मतदारांची यादी अद्यावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गोगलवाडी (ता. हवेली) या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. यासाठी 13 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. विद्यमान ग्रामपंचायत सदस्या असलेल्या पल्लवी नामदेव गोगावले यांनी यादी पडताळणी केली असता मतदार यादीतून त्यांचे नावच वगळण्यात आल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.

यासंदर्भात त्यांनी हवेली तहसील कार्यालयात या सर्व बाबींची माहिती घेतली असता, कोणी तरी आपले नाव यादीतून कमी करण्यासाठी 7 नंबरचा फॉर्म भरला आहे, हे उघड झाले. याविषयी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गावातील कोणी तरी नेत्याने किंवा एखाद्याने हे कट कारस्थान केले असणार आहे. ही बाब अत्यंत चुकीची व अक्षम्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मतदार यादीतून नाव कमी केलेल्या विद्यमान सदस्या पल्लवी नामदेव गोगावले यांनी केली आहे.

या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे. सदरचे नाव कोणत्या प्रक्रियेतून किंबहुना कशाच्या आधारे वगळण्यात आले आहे, हे तपासले जाईल. सध्या मतदान नोंदणीसाठी असलेली वेबसाईट 9 नोव्हेंबरपर्यंत बंद आहे. त्यामुळे याबाबत काहीच करू शकत नाही. पूर्ण माहिती वेबसाईटवरून घेऊनच देता येईल व पुढील कारवाई करण्यात येईल.

                                                             – तृप्ती कोलते पाटील,
                                                            हवेली तालुका तहसीलदार

Back to top button