देवाला साकडे घालूनही हुजेफा वडीलांच्या छत्राला मुकला! मन हेलावणारी घटना | पुढारी

देवाला साकडे घालूनही हुजेफा वडीलांच्या छत्राला मुकला! मन हेलावणारी घटना

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: महामार्गावरून बापलेकाचा प्रवास.. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनाची जोरदार पलटी.. बेशुद्ध वडीलांना वाचविण्यासाठी मुलाचा आटापिटा, त्यांचे प्राण वाचावे यासाठी घटनास्थळीच देवाला मुलाचे साकडे, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच वडीलांचा जागेवर मृत्यू.. या घटनेमुळे प्रत्यक्ष उपस्थितांची मनेही हेलावली. पुणे – सातारा महामार्गावर ही घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी कि, वसीम सय्यद हे तीन प्रवांशासह आपल्या १५ वर्षीय हुजेफा मुलाला घेऊन त्यांच्या चारचाकी वाहनाने गावी जात असताना अपघात घडला. यावेळी गाडीतील सर्व जखमी सावध होते. मात्र स्वतःचे वडील शुद्धीवर येत नसल्याने रडवेलेल्या हुजेफाने बेशुद्धावस्थेत असलेल्या वडीलांच्या कानाला फोन लावून पप्पा उठो ना, मम्मी से बात करो, असे वारंवार सांगत राहिला.

तर रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेत असताना बेशुद्धावस्थेत वसीम यांच्या शेजारी बसलेला हुजेफा वडिलांचे प्राण वाचावे यासाठी अल्लाकडे दुवा करत राहिला. मात्र दुर्दैवाने वडीलांच्या छत्राला हुजेफा मुकला. यावेळी प्रत्यक्षदर्शनी असणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. वसीम इब्राहीम सय्यद (वय ४२ मुजावर कालनी, कराड, जि. सातारा ) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून हुजेफा वसीम सय्यद (वय १५ रा. मुजावर कालनी, कराड, जि. सातारा ) जावेद आदिलशाह इनामदार (वय ३६,) शैरोनिसा जावेद इनामदार ( दोघेही रा. नऱ्हे आंबेगाव) शाहरुख शरीफ मुजावर वय ३० ( रा. हिरवडे, ता. करवीर, कोल्हापूर ) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ ( ता. भोर ) उड्डाणपुल रस्त्यावर गुरुवारी ( दि. २७ ) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, पुणे – सातारा या महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलावरील पडलेले खड्डे चुकवताना एक दुचाकी अचानक समोर आल्याने झायलो (MH 14 BX 4764) या वाहनावरील चालक वसीम सय्यद यांनी दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी ब्रेक दाबला.

यामुळे झायलो कारच्या जोरदार तीन पलट्या झाल्या. मोठा आवाज आल्याने शेजारील पंपावरील चालक प्रशांत सुके, मनोज कोंडे व इतर प्रवाशांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. जखमींना सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वसीम सय्यद उपचारापूर्वी मयत झाले.

 

Back to top button