पिंपरी: दिशादर्शक फलक नाही; वाहनचालक संभ्रमात | पुढारी

पिंपरी: दिशादर्शक फलक नाही; वाहनचालक संभ्रमात

श्रीकांत बोरावके

मोशी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणार्‍या उत्तेरकडून येताना स्वागत कमान किंवा दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. शहरात आलेल्या वाहनांतील प्रवाशांच्या स्वागतासाठी मोशी भागात स्वागत कमान अथवा साधा बोर्ड ही दिसून येत नाही यामुळे आलेल्या वाहनचालकांना आपण पिंपरी चिंचवड शहरात आलो की नाही यांचाही संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

या गोष्टीबाबत स्थानिक नागरिकांडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात आहे शिवाय मुख्य शहरात भव्य शिल्प उभारले जात असताना उपनगरात शिल्प उभारणीत दुष्काळ का, असा ही सवाल उपस्थित केला जात आहे. नाशिकडून येणारी वाहने इंद्रायणी नदी ओलांडून खेड तालुक्यातून हवेली म्हणजेच पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करतात. अशावेळी त्यांच्या स्वागतासाठी एकही कमान दिसून येत नाही की पिंपरी चिंचवड शहरात आपले सहर्ष स्वागत आहे म्हणणारे बोर्ड. शहरात विविध ठिकाणी उद्योगनगरीची अनोखी ओळख सांगणारे नवीन शिल्प महानगर पालिकेने बसविले आहेत. पण याच उद्योगनगरीत येणार्‍या वाहचालकांचे मार्गदर्शक ठरतील असे फलक बसविण्यात पालिका विसरली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत मोशी हे गाव असून याच गावातून उत्तरेकडून नाशिक,अहमदनगर भागातून नाशिक महामार्गद्वारे जास्तीत जास्त नागरिक शहरात प्रवेश करत असतात काही पर्यटक देखील देहू-आळंदीला जाण्यासाठी मोशीतून येत असतात वारकरी भाविकांची रेलचेल असणारा हा भाग असताना देखील या मार्गावर ना वारकरी शिल्प दिसत, ना शहरात स्वागत करणारे फलक एवढेच काय तर स्वागताला साध्या बोलक्या भिंती देखील दिसून येत नाही.

यामुळे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत असून शहराच्या उत्तरेकडील वेशीवर भव्य कमान,शिल्प स्वागताला उभारले जावे शहरात प्रवेश करताच आपले पिंपरी चिंचवड शहरात सहर्ष स्वागत आहे, असे फलक लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे. उत्तरेबरोबरच पूर्व,पश्चिम, दक्षिण बाजूला देखील अशीच अवस्था असून केवळ एका फलकावर स्वागत करत असल्याचा उल्लेख याही दिशांना दिसून येतो. पूर्वेला आळंदी,देहू जवळ असल्याने ज्ञानोबा-तुकोबा,उत्तरेला मावळ,खेड भागातून छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी राजे यांची स्वागत शिल्पे,पुण्याकडून येणार्‍या दिशेला शहराची आधुनिक ओळख सांगणारी शिल्पे उभारली जाऊ शकतात, अशा सूचना नागरिकांनी केली आहे.

Back to top button