निजामुद्दीन एक्स्प्रेस 12 तास लटकली ; बुधवारी पोहचली पुणे रेल्वे स्थानकावर | पुढारी

निजामुद्दीन एक्स्प्रेस 12 तास लटकली ; बुधवारी पोहचली पुणे रेल्वे स्थानकावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर मंगळवारी तब्बल बारा तास थांबविण्यात आली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन ही गाडी पुण्याकडे सोडण्यास सांगितल्यामुळे अखेर ही गाडी  बुधवारी पुणे स्थानकावर सकाळी पोहचली आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सोलापूर विभागात सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे दिल्लीहून येणारी हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने थांबवून ठेवली.

त्यामुळे प्रवाशांना बारा तास रेल्वेगाडीतच ताटकळत बसावे लागले. बारा तासांपासून रेल्वे नगरमध्येच उभी असल्याची माहिती खासदार सुळे यांना समजताच त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत रेल्वे थेट पुण्याकडे रवाना करण्यास सांगितले. त्यानंतर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुण्यात दाखल झाली. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी फोनद्वारे ही सगळी घटना खासदार सुळे यांना सांगितली होती. यानंतर सुप्रिया सुळेंनी रेल्वेच्या पुण्यातील विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधत प्रवाशांच्या अडचणी सांगत, योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठी मदत झाली.

 

सोलापूर विभागात सुरू असलेल्या तांत्रिक कारणांमुळे हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला काही प्रमाणात उशीर झाला होता. मात्र, याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या असून, गाडी पुढील मार्गावर रवाना करण्यात आली आहे.
                                    – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

Back to top button