राजगुरूनगर: तोतया पोलीस निरीक्षकाचा खेड ठाण्यात रूबाब ; चौकशी नंतर जेलची हवा | पुढारी

राजगुरूनगर: तोतया पोलीस निरीक्षकाचा खेड ठाण्यात रूबाब ; चौकशी नंतर जेलची हवा

राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा : आपण पोलीस निरीक्षक असून आपले थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, असे फोनवरून सांगून पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रूबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली आहे. संदिपराजे गणतराव निंबाळकर, (रा.वारु ,ता.मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस सुनिल ज्ञानेश्वर बांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार,रोहन सिताराम गायकवाड, (रा विश्वकल्याण सोसायटी, शिरोली,ता. खेड,) यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल होती. त्यांना शुक्रवारी (दि १५) निंबाळकर याचा फोन आला की मी तुम्हाला तुमच्या तक्रारीत मदत करतो. गायकवाड यांनी खेड पोलिसांना याबाबतीत लगेचच माहिती दिली. पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चौकशी सुरू केली. तोतया निरीक्षकाला फोनवर विचारणा करून पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. हे महाशय पुढे-मागे पोलीस लिहिलेल्या आणि लोगो असलेल्या दुचाकीवर ठाण्यात हजर झाले. तेही पोलिसी रुबाबतच. पोलिसांनी मात्र त्याचा भांडाफोड केलाच. तत्पूर्वी आपल्याकडील बनावट आय कार्ड दाखवत मी नागपुरात ट्रेनिंग घेऊन प्रथम पोलीस निरीक्षक व नंतर सहा वर्षे आजारी रजा घेऊन थेट पोलीस निरीक्षक झाल्याचे त्याने सतिशकुमार गुरव यांना सांगितले होते. अखेर चौकशीत हा तोतया निघाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, एका अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या बायकोचा हा भाऊ म्हणजे साहेबांचा मेहुणा असल्याचे समजते. त्यामुळे या तोतया निरीक्षकाने आणखी कोणकोणत्या तक्रारीत किती जणांना मदत केली. किती माया गोळा केली याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलिसांकडुन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नातेसंबंध असल्याचे स्पष्ट सांगितले गेले नाही.

Back to top button