मध्यवस्तीत ‘ट्रॅफिक जाम’ दिवाळीची खरेदी, वीकेंडमुळे वाहनांची गर्दी | पुढारी

मध्यवस्तीत ‘ट्रॅफिक जाम’ दिवाळीची खरेदी, वीकेंडमुळे वाहनांची गर्दी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कधी नव्हे तेवढी वाहने शनिवारी दिवाळी सणाच्या खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्यामुळे मध्यवस्तीसह प्रसिद्ध रस्ते, पेठा आणि गल्लीबोळांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातून रस्ता काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले. तर, या कोंडीत सापडलेल्या वाहनचालकाला सुटण्यासाठी दोन ते अडीच तास कसरत करावी लागली. दरवर्षी दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवार, रविवारी सायंकाळच्या सुमारास गर्दी होत असते. मात्र, सध्या परतीचा पाऊस सायंकाळी हजेरी लावत असल्याने, या वेळी-अवेळी कोसळणार्‍या पावसाच्या भीतीने दिवाळी सणाच्या खरेदीसाठी पुणेकर शनिवारी सकाळपासूनच घराबाहेर पडले होते.

अप्पा बळवंत चौक ते टिळक रोडवर दोन तास लागले
अप्पा बळवंत चौकात दुपारी एक वाजता माझी गाडी होती. मला टिळक रस्त्यावरच पोहोचायला तीन वाजले. या अंतरावर तब्बल दोन तास मी कोंडीत अडकलो आहे. अजून टिळक रस्ताही जाम आहे. खूप वैताग आला आहे. असे एका चारचाकी चालकाने दै.‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

उपनगरीय भागातील रस्ते मोकळे : एकीकडे मध्यवस्ती आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर दिवाळीच्या खरेदीमुळे शनिवारी प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर दुसरीकडे उपनगरीय भाग आणि मध्यवस्तीबाहेरील रस्ते रिकामेच असल्याचे पाहायला मिळाले.

पावसामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे अगोदरच वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यातच वीकेंड, सुट्यांमुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बहुतांश नागरिक मध्यवस्तीकडे आले. त्यामुळे मध्यवस्तीतून जाणारे आणि आजूबाजूच्या प्रसिद्ध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. दुपारनंतर ती कमी करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले.
                                                   – राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

कार्यकर्ते उतरले रस्त्यावर…
शनिवारी मध्यवस्तीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. एका जागेवर गाडीवरच बराच वेळ उभे राहून वाहनचालकांच्या नाकीनऊ आले होते. परिसरात झालेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि वैतागलेले वाहनचालक पाहून ठिकठिकाणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनीच वाहतूक नियोजनाचे काम हाती घेतले. मध्यवस्तीतील बर्‍याच छोट्या-मोठ्या चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

शहरातील प्रमुख रस्ते, पेठा, गल्लीबोळ जाम
शहरातील प्रमुख रस्ते असलेले टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यासह मध्यवस्तीतील छोटे रस्ते, गल्लीबोळांमध्येसुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. बाजारपेठांमध्ये तर वाहनांना प्रवेशच नव्हता, तेथे खरेदीला आलेल्या नागरिकांचीच मोठी गर्दी होती. मध्यवस्तीतील मंडई, बोहरी आळी, रविवार पेठ, कसबा पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ सह अन्य मध्यवस्तीच्या भागांत प्रचंड कोंडीचे चित्र दिसले.

वाहनचालकांमध्ये वादावादी…
शहरात शनिवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अगोदरच हैराण झालेल्या वाहनचालकांचे ठिकठिकाणी त्यांच्यातच खटके उडताना पाहायला मिळत होते. कोणी मागून धडकला म्हणून, तर कोणी रस्त्यातच गाडी आडवी का घातलीस म्हणून, तर कोणी मला पुढे जाऊन दिले नाहीस म्हणून रस्त्यातच वाद घालताना पाहायला मिळाले.

Back to top button