पुणे : नेत्रदानासाठी भरले जाणारे अर्ज आणि प्रत्यक्षात केले जाणारे नेत्रदान, यामध्ये मोठी तफावत | पुढारी

पुणे : नेत्रदानासाठी भरले जाणारे अर्ज आणि प्रत्यक्षात केले जाणारे नेत्रदान, यामध्ये मोठी तफावत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नेत्रदान चळवळीला बळकटी देण्यासाठी वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नेत्रदानासाठी भरले जाणारे अर्ज आणि प्रत्यक्षात केले जाणारे नेत्रदान, यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र नेत्र प्रत्यारोपणाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ससून रुग्णालयाच्या नेत्रपेढीमध्ये नोव्हेंबर 2014 पासून आजवर 2787 कॉर्निया (डोळ्यांचा एक भाग) काढण्यात यश मिळाले. त्यापैकी 2091 कॉर्नियांचे प्रत्यारोपण करण्यात आले. कॉर्निया वापरण्याचा ससूनमधील दर 75 % इतका असून, राष्ट्रीय दरापेक्षा (46 टक्के) तो जास्त आहे. ससून रुग्णालयात महिन्याला सरासरी 5 ते 6 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडतात. ससून रुग्णालयात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 45 शस्त्रक्रिया पार पडल्या.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत डोळे काढणे आवश्यक असते. यासाठी मृत्यू दाखला, मृत्यूचे कारण, दात्याची वैद्यकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी, नातेवाइकांची संमती, अशी प्रक्रिया पूर्ण केली जाते. दात्याच्या रक्ताचे नमुने घेऊन एचआयव्ही, हिपॅटिटिस, सिफिलिस आदी तपासण्या केल्या जातात. डोळे प्रत्यारोपणायोग्य आहेत की नाहीत, याचीही बारकाईने तपासणी केली जाते.
                   – डॉ. संजीवनी अभ्यंकर, नेत्र विभागप्रमुख, ससून रुग्णालय

नेत्रदानाचे अर्ज, अर्जदाराला द्यावे लागणारे कार्ड, अशी प्रक्रिया पार पाडण्यात अनेक अडचणी येतात. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा अर्ज भरला आणि त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर नातेवाइकांची परवानगी नसल्यास नेत्रदानाबाबत सक्ती करता येत नाही. नेत्र प्रत्यारोपणासाठी लागणारे कौशल्य असणार्‍या डॉक्टरांची संख्या वाढणे आवश्यक आहे. जिकिरीचे काम करणारे नागरिक, शेतकरी यांच्यामध्ये डोळ्यांना दुखापत होण्याचे प्रमाण जास्त आहे. नेत्रपेढीसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, रेकॉर्ड ठेवणे, याबाबत पूर्ण तयारी करण्याची आवश्यकता असते. नेत्रसंकलन करण्याचे कामही जोखमीचे आहे.
                     – डॉ. श्रीकांत जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Back to top button