कौतुकास्पद ! विद्यार्थ्यांनी साकारल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू | पुढारी

कौतुकास्पद ! विद्यार्थ्यांनी साकारल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू

धनकवडी; वृत्तसेवा: कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात वन्यजीव सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. याअंतर्गत पथनाट्य, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पिशव्या, चपला, वॉटर डिस्पेंसर, अशा विविध पर्यावरणपूरक वस्तू विद्यार्थ्यांनी बनविल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सप्ताहभर घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारोपाच्या दिवशी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी शरद यादव, पर्यवेक्षिका उषा काळे, वरिष्ठ पशुपालक कौशिक काशीकर आणि पर्यावरणतज्ज्ञ प्रशांत धारणे आदी उपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले, ‘वन्यजीव संरक्षण व संवर्धन विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये प्रबोधनाची गरज आहे. त्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासन कटिबद्ध आहे. वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि जनसामान्यांपर्यंत वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. गेला सप्ताहभर परिसरातील आठ शाळांमधील सुमारे 1150 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.’

Back to top button