महिलांना रक्तदानासाठी ॲनिमियाचा अडथळा | पुढारी

महिलांना रक्तदानासाठी ॲनिमियाचा अडथळा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. पुरुषांप्रमाणे आपणही नियमितपणे रक्तदान करावे, असे अनेक महिलांना वाटते. पण हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आलेला अशक्तपणा अनेकींसाठी अडसर ठरतो. त्यामुळे खूप इच्छा असूनही बर्‍याच जणींना केवळ लोह कमी असल्याने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरामध्येदेखील महिलांचे प्रमाण अल्प असते. कधी कधी तर शून्य असते.

महिलांना चार महिन्यांतून एकदा रक्तदान करण्याची परवानगी

पुरुषांनी तीन महिन्यांतून एकदा तर महिलांनी चार महिन्यांतून एकदा रक्तदान करावे. रक्तदान करण्यासाठी महिलांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण हे 12 किंवा त्यापेक्षा जास्त तर पुरुषांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण हे 14 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पण बहुतांश महिलांचे हिमोग्लोबिन हे 10 किंवा त्यापेक्षाही कमी असते, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

धावपळीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष
धावपळीच्या युगामध्ये गृहिणी असो किंवा नोकरदार महिला घरकाम आणि नोकरी सांभाळताना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. गृहिणी असली तरी घरातल्या सगळ्यांच्या वेळा सांभाळण्यात ती अडकून जाते आणि नोकरदार किंवा बिझनेस वुमन असली, की घरासोबतच बाहेरच्या जबाबदार्‍यांसाठी तिला वेळेची जुळवाजुळव करावी लागते. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट मात्र बहुतांश महिला विसरून जातात आणि ते म्हणजे आहार.

हिमोग्लोबिन वाढविणार्‍या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला
शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच लोह किंवा आयर्न कमी असणे म्हणजेच ती स्त्री अ‍ॅनिमिक असणे. अजूनही खूप इच्छा असूनही केवळ हिमोग्लोबिन कमी असल्याने अनेक महिला रक्तदान करू शकत नाहीत. एक्सरसाईज, वॉकिंग, जीम या सगळ्या गोष्टी अनेकजणी नियमितपणे अगदी न चुकता करतात. पण हिमोग्लोबिन वाढविणार्‍या पदार्थांचा आहारात समावेश नसल्याने वरवर अगदी सुदृढ दिसत असल्या तरी आतून अनेक महिला अशक्त असतात. रक्ताची कमतरता असल्यामुळे आपण फक्त अशक्तच होत नाही, तर रोगप्रतिकारक क्षमतादेखील कमी होते.

आम्ही जेव्हा रक्तदान शिबिरे घेतो त्या वेळी महिलांचा सहभाग फारच कमी असतो. शंभर पुरुषांमागे 15 ते 20 महिलांना रक्तदान करता येते. बाकी हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तदान करू शकत नाहीत. तरी आम्ही दोन महिने महिलांना रक्तदानासाठी आहाराविषयी जनजागृती करत असतो. तसेच त्यांना रक्तवाढीसाठी सामग्रीदेखील पुरवितो.
                                               – मंगेश बडद, प्रसिद्धीप्रमुख संत निरंकारी मिशन

हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे
अतिश्रमांची कामे.
व्रतवैकल्ये आणि उपवास.
आहाराकडे दुर्लक्ष.
वारंवार होणारे गर्भपात.
बाळांतपण आणि गर्भाशयासंबंधीचे आजार.
काही नवीन उपाय
जाणून घेऊ या
सैंधव मीठ आणि लसनाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.
शिजविलेल्या पालकाचा रस दिवसातून 3 वेळा घ्यावा.
जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणत एकत्र करून प्यायल्याने शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.
एक ग्लास टोमॅटोचा रस प्यावा.
मक्याचे कणीस भाजून खाल्ल्याने किंवा मक्याचे दाणे उकडून खाल्ल्याने स्वादूपिंड मजबूत होते.

Back to top button