भिगवण : अरेरावी करणार्‍या महिला वाहक अखेर नरमल्या | पुढारी

भिगवण : अरेरावी करणार्‍या महिला वाहक अखेर नरमल्या

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: बारामती एसटी आगाराच्या महिला वाहकाने एका कॉलेज युवतीला अतिशय अपमानास्पद वागणूक दिली. ही बाब मुलीच्या पालकांना कळल्यानंतर त्यांनी शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे शटल थांबवत सदरच्या महिला वाहकाला जाब विचारला. तेव्हा मात्र सदर वाहकाने ‘ती मी नव्हेच’ असा आव आणला.

मात्र, वाहकाचा हा प्रताप पाहणार्‍या मुला- मुलींनी ‘हीच ती’ म्हणत तिचे तोंडच बंद केले. बारामती आगारातून शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी चार वाजता बारामती- भिगवण ही शटल निघाली. त्यात प्रवासी व शालेय विद्यार्थी होते. या शटलच्या महिला वाहकाने टीसी कॉलेज व व्हीपी कॉलेज बसथांब्याजवळ आल्यानंतर जागा असूनही ठरावीकच विद्यार्थ्यांना घेतले व इतरांना दुसर्‍या एसटीने या, असे फर्मावले.

त्याच वेळी एक विद्यार्थिनी शटलमध्ये चढली. त्यामुळे इगो दुखावलेल्या महिला वाहकाने तोंडपट्टा सुरू केला. या अपमानामुळे विद्यार्थिनीला रडू कोसळले. या घटनेचा व्हिडीओ बनवण्यात आला. दरम्यान सदरच्या मुलीने ही घटना आपल्या पालकांना मोबाईलवर कळविली. सदर बस सायंकाळी पाचच्या दरम्यान शेटफळगढे येथे येताच पालकांनी बस रोखली.

मुलीच्या पालकांनी सदर वाहक महिलेला आपला रुद्रावतार दाखविला. तेव्हा मात्र आपण ती वाहक नाही, असे सांगू लागली.  मात्र, प्रत्यक्षदर्शींनी हीच ती असे सांगितल्याने वाहक नरमल्या. दरम्यान, इतर बसचालक तिथे आले. त्यांनी मध्यस्थी करत संतप्त ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर हे प्रकरण निवळले.

Back to top button