कळमकर चौकात रस्त्याचे काम अर्धवट; बाणेर येथे वाहतूक कोंडीमुळे गैरसोय | पुढारी

कळमकर चौकात रस्त्याचे काम अर्धवट; बाणेर येथे वाहतूक कोंडीमुळे गैरसोय

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: गेल्या आठ वर्षांपासून जागा ताब्यात न आल्याने बाणेर येथील सर्वे नंबर 67 येथील राघूनाना कळमकर चौकातील रस्त्याचे काम अर्धवट आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या ठिकाणी दोन्ही बाजूचे रस्ते अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. गणराज चौकाकडून येणारा रस्ता व धनकुडे वस्तीवरून येणारा रस्ता या दोन्ही बाजूला चौकामध्ये हा रस्ता अपूर्ण आहे. चौकातील जागा ताब्यात नसल्याने दोन्ही रस्ते अरुंद झाले असून, नेमका हा अनुत्तरीत प्रश्न सुटणार तरी कधी? असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.

रस्त्यांच्या परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. आधीच काम अर्धवट असून, त्यात अतिक्रमण झाल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील काही सोसायट्यांतील रहिवाशांनी ही अतिक्रमण हटविण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे केली. परंतु, यावर प्रशासन काहीच मार्ग काढत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

जागा मालकाला योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्यास प्रशासकीय यंत्रणा अयशस्वी ठरत आहे. गणराज चौकाकडील रस्ता 30 मीटरचा, तर पॅन कार्ड रोड धनकुडे वस्तीवरून येणार रस्ता हा 24 मीटरचा आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूचा हा रस्ता अर्धवट आहे. यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’, अशी परिस्थिती या रस्त्याबाबत निर्माण झाली आहे. यासंदर्भात मालमत्ता विभागाचे अधिकारी जे. बी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

Back to top button