पुणे : लाभाचे आमिष पडले महागात; दोन कोटींची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : लाभाचे आमिष पडले महागात; दोन कोटींची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गुंतवणुकीवर मासिक पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने 2 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. संकल्प आखरे, सुधाकर आखरे, स्नेहल आखरे, युगा शिरुडे, सागर शिरुडे (सर्व राहणार सूस रोड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत दीपक विनोदराव उगले (वय 41, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद
दिली आहे.  आरोपी व फिर्यादी हे एकामेकांच्या परिचयाचे असून, नातेवाईक आहेत.

आरोपींनी अशाप्रकारे एकूण 27 जणांची फसवणूक केली होती. त्यातील दहा जणांचे त्यांनी पैसे परत दिले आहेत. मात्र, इतर व्यक्तींनी वारंवार पैसे मागून देखील ते पैसे परत करीत नव्हते. सर्व पैसे फिर्यादी व त्यांचे मित्र नातेवाईक यांनी ऑनलाइन माध्यमातून दिले आहेत. गुंतविलेले पैसे परत मागितले म्हणून आरोपी त्यांना दमदाटी करीत होते.

आरोपींनी सागा असोसिएट्स या कंपनीचे संचालक असल्याचे फिर्यादी व त्यांच्या मित्र, नातेवाइकांना सांगितले. ते बांधकाम व्यवसाय, इंटेरिअर डिझायनिंग बांधकाम व्यवसायाशी निगडित सेवा पुरविण्याचा व्यवसाय करतात, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांचा विश्वास संपादन करून कंपनीत गुंतवणूक केल्यास मासिक पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.

फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांकडून आरोपींनी 2 कोटी 3 लाख 24 हजार रुपये ठेवी म्हणून घेतल्या. वारंवार गुंतवणूक केलेले पैसे परत मागून देखील मिळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली.

Back to top button