येरवड्यात वाहतूक कोंडी नित्याची; नागरिक, वाहनचालक त्रस्त | पुढारी

येरवड्यात वाहतूक कोंडी नित्याची; नागरिक, वाहनचालक त्रस्त

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: येरवडा येथील प्रमुख मार्गांवर दररोज होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भर दुपारी येरवडा पुलावर काम सुरू असल्यामुळे गुरुवारी नवीन व जुन्या पुलावर वर्तुळाकार वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी झालेल्या पावसामुळे देखील कोंडी झाल्याने दिवसभर कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. येरवड्याहून नगर रस्ता, विमानतळाकडे ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये येरवड्याहून पुढे नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’मुळे रस्ते अरुंद झाले आहेत.

अशातच मेट्रोचे काम सुरू आहे. तसेच गोल्फ क्लब चौकात उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे. त्यामुळे या भागात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवारी येरवडा पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दुपारी दोन ते तीन यादरम्यान वाहतूक कोंडी झाली होती.

येरवडा पर्णकुटी चौक ते बंडगार्डनपासून डॉ. आंबेडकर सेतू ते तारकेशवर चौक, अशी वर्तुळाकार वाहतूक कोंडी झाली होती. परिसरात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. त्यामुळे संपूर्ण दिवस वाहतूक कोंडीत गेल्याने वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले होते.

येरवडा पुलावर दुपारी खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते, त्यामुळे वाहतूक कोंडी होती. वाहतूक पोलिसांनी एका तासात वाहतूक सुरळीत केली. त्यात सायंकाळी पाऊस झाल्याने पुन्हा वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियमन केले.

                               – जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, येरवडा वाहतूक विभाग

Back to top button