पुणे : टेरेसवरून उडी मारून नवविवाहितेची आत्महत्या | पुढारी

पुणे : टेरेसवरून उडी मारून नवविवाहितेची आत्महत्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सासरी होणार्‍या छळाला कंटाळून नवविवाहितेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. माधुरी सुशांत वाघमारे (वय 23, रा. मुजांबावस्ती, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी तिचा पती व सासूवर गुन्हा दाखल केला आहे. सुशांत वाघमारे आणि प्रमिला वाघमारे (रा. मुंजाबावस्ती, धानोरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी माधुरीचे वडील आनंदा लक्ष्मण कांबळे (वय 47, रा. निवृत्ती हाईट, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 एप्रिल ते 2 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी माधुरी हिचा सुशांतबरोबर 10 एप्रिल रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर सुशांतने वारंवार दारू पिऊन येऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली.

सासूने घरातील स्वयंपाक येत नाही़, वारंवार माहेरी जायचे नाही, असे म्हणून तिचा मानसिक छळ केला. याला कंटाळून माधुरीने 2 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक लुगडे तपास करीत आहेत.

 

 

Back to top button