रानमळ्यात बिबट्या अडकला, यंदा पकडण्यात आलेला हा चौथा बिबट्या | पुढारी

रानमळ्यात बिबट्या अडकला, यंदा पकडण्यात आलेला हा चौथा बिबट्या

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : बेल्हे (रानमळा, ता. जुन्नर) शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात मंगळवारी (दि. 27) पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाली. रानमळा परिसरात चंद्रकांत सबाजी गुंजाळ यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात सदर मादी अडकली. या परिसरात यंदा पकडण्यात आलेला हा चौथा बिबट्या आहे. त्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती वनपाल राजलक्ष्मी वीर यांनी दिली. याबाबत दादाभाऊ भगवंत गुंजाळ यांनी सांगितले की, रानमळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या मंगळवारी पहाटे चंद्रकांत सबाजी गुंजाळ यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला. बिबट्याची मादी सुमारे साडेतीन वर्षांची आहे.

रानमळा परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घराच्या अंगणात बांधलेल्या शेळ्यांची दोन करडे ठार केल्याची घटना ताजी असतानाच गुंजाळ यांच्या गोठ्यात प्रवेश करीत बिबट्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. त्याच्या दुसर्‍या दिवशीच सकाळी तीन बिबट्यांनी चंद्रकांत गुंजाळ यांच्या घरासमोर तासभर ठिय्या दिला होता, तर पंधरा दिवसांपूर्वी मंगरूळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला होता. झापवाडी येथे दोन महिला बिबट्याच्या हल्ल्यातून बचावल्या.  ज्या ठिकाणी बिबट्या पिंजर्‍यात अडकला, त्या शेतकर्‍याच्या चार शेळ्या बिबट्याने एका आठवड्यात ठार केल्या. त्यामुळे तेथे पिंजरा लावण्यात आला होता. शेतकर्‍यांनी बिबट्याच्या व्यथा मांडल्यानंतर बेल्हे वनपाल राजलक्ष्मी वीर यांनी बिबट्याला पकडण्यासाठी
पिंजरा लावला.

Back to top button