पिंपरी : ‘हॉटेल वेस्ट’ची समस्या कायमची मिटणार, महापालिकेचा दावा | पुढारी

पिंपरी : ‘हॉटेल वेस्ट’ची समस्या कायमची मिटणार, महापालिकेचा दावा

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 1 हजार 150 टन कचरा जमा होतो. त्यात 50 टन कचरा हॉटेल वेस्ट (फूट वेस्ट) आहे. त्यावर प्रक्रिया करून सीएनजी तयार करून तो वाहनांना विकला जाणार आहे. मोशी कचरा डेपो येथे तयार होत असलेल्या या प्रकल्पामुळे ‘हॉटेल वेस्ट’ची समस्या 100 टक्के मिटणार आहे, असे दावा महापालिकेने केला आहे.पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे दररोज 1 हजार 150 टन ओला, सुका, हॉटेल वेस्ट, मंडई वेस्ट, ग्रीन वेस्ट, चिकन वेस्ट, असा कचरा मोशी डेपोत जमा होत आहे. तेथे सुमारे 30 वर्षांपासून कचरा जमा झाला आहे.

त्यावर पालिका प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. कचरा वाढत असल्याने मोशी डेपोची जागा अपुरी पडत आहे. तेथील कचर्‍यावर प्रक्रिया करून इतरत्र त्यांचा वापर केला जात आहे. बायोमायनिंग केले जात आहे. प्लास्टिक कचर्‍यापासून कच्चा माल करून तो कंपन्यांना पुरविला जात आहे.एकूण 700 टन सुक्या कचर्‍यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, तळेगाव एमआयडीसीत खासगी एजन्सीच्या मदतीने हॉटेल वेस्टपासून बायोगॅस तयार करण्याचा निर्णय पालिकेने सन 2017 ला घेतला होता. मात्र, वारंवार नोटीसा देऊनही एजन्सीला प्रकल्प अखेरपर्यंत सुरू करता आला नाही. तो प्रकल्प अखेर गुंडाळण्यात आला.

जानेवारीत प्रकल्प सुरू होणार
हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उभारत आहे. सध्या स्थापत्य काम सुरू आहे. ते जानेवारी 2023 ला पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष गॅस निर्माण केला जाईल, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

चार एकर जागेत बायोगॅस प्रकल्प
पुढील 10 वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मोशी कचरा डेपोच्या 81 एकर जागेपैकी 4 एकर जागेत बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहे. दररोज हॉटेल वेस्ट संकलन करणे, त्यासाठी वाहने व मनुष्यबळ नेमणे, त्यांचे विलगीकरण करणे, मोशी डेपोपर्यंत त्याची वाहतूक करणे आदी सर्व खर्च संबंधित एजन्सीला करावा लागणार आहे. टीफीन चार्जस म्हणून पालिका एजन्सीला प्रत्येक टनास 801 रूपये शुल्क देणार आहे. या कामासाठी अवनी डीएम ग्रीन एनर्जी प्रा. लि. या खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.

2 हजार हॉटेल्समधील ‘वेस्ट’चा प्रश्न सुटणार
शहरात दोन हजारांपेक्षा अधिक हॉटेल्स व रेस्टॉरंट आहेत. तर, खाद्यपदार्थाचे शेकडो स्टॉल आहेत. त्यातून दिवसाला सुमारे 50 टन हॉटेल वेस्ट निर्माण होतो. त्यात शिल्लक, खरखटे अन्नपदार्थ, भाजीपाला आदींचा समावेश आहे. त्यावर प्रकिया करून बायोगॅस प्रकल्पात सीएनजी तयार केला जाणार आहे. त्यामुळे या कचर्‍याची 100 टक्के विल्हेवाट लागणार आहे. काही हॉटेल व स्टॉलधारक हॉटेल वेस्ट ड्रेनेज, नाला, ओढा व नदीकडेला तसेच, उघड्यावर टाकून देतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची गुजराण होत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Back to top button