भोसरी : अस्वच्छतेमुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव | पुढारी

भोसरी : अस्वच्छतेमुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : परिसरात नियमित औषध फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, विविध साथींचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औषध फवारणी करण्याची मागणी केली जात आहे. भोसरी परिसरात गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत आहे. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी तयार झाली आहेत. या पाण्यामध्ये डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये तसेच परिसरातील मोकळ्या जागेत वाढणार्‍या गवतावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी पालिकेच्या संबंधित विभागाकडे केली आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. थंडी, ताप, सर्दी, घसा दुखणे, कणकणी असे आजार असलेले रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. भोसरी परिसरात पावसाच्या पाण्याचे डबके सर्वत्र सचलेले आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्णदेखील वाढत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने परिसरातील साचलेल्या पाण्याच्या तळीवर तसेच इतर ठिकाणी त्वरित औषध फवारणी करणे गरजेचे आहे.

डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आधी मोकळ्या जागेत किंवा उद्यानात गेल्यावर डास चावत असत. परंतु, सध्या घरातदेखील डास त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित औषध फवारणी करावी.
                                                                           – स्थानिक नागरिक

Back to top button