नसरापूर : चेहर्‍यावरील हास्य हीच पावती; निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन | पुढारी

नसरापूर : चेहर्‍यावरील हास्य हीच पावती; निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: लाभार्थ्यांना अनुदान व विविध योजनांचा लाभ मिळत आहे. याचा प्रत्यय भोरमध्ये आलेल्या लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावरील हास्य सांगते. हेच हास्य आमच्या सरकारसाठी पावती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे पक्ष संघटन व वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भोर विधानसभा मतदारसंघातील केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद व योजनातील लाभाचे वितरण यावेळी सीतारामन यांच्या हस्ते वरवे (ता. भोर) येथील शिवनेरी मंगल कार्यालयात करण्यात आले.

याप्रसंगी सीतारामन बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राहुल कुल, गोपीनाथ पडळकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राहुल शेवाळे, किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, माजी मंत्री बाळा भेगडे, शरद ढमाले, भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, भोर शहराध्यक्ष सचिन मांडके, सुनील जागडे, आण्णा शिंदे, बाळासाहेब गरुड, वैभव धाडवे, धर्मेंद्र खांडरे आदी उपस्थित होते. वासुदेव काळे, जीवन कोंडे, सचिन मांडके यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्यातील नेत्यांना घरचा आहेर राज्यातील भाजपचे नेते सतत सांगत असतात की, बारामती लोकसभा मतदारसंघात आपण पवारांना शह देण्यासाठी सीतारामन यांना आणले आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी वेळोवेळी ’नो कॉमेंट’ असा पवित्रा घेत आपण केवळ बारामती मतदारसंघात पक्ष संघटन वाढीसाठी आले आहे. राज्यातील भाजपचे नेते जे काही बोलतात ते त्यांचे मत आहे. त्याबाबत मला काही घेणे नाही, असे सीतारामन यांनी स्पष्ट करत त्यांनी राज्यातील नेत्यांना घरचा आहेर दिला.

Back to top button