पुणे : विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचे ठिय्या आंदोलन | पुढारी

पुणे : विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचे ठिय्या आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), तसेच युक्रांद आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदी संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची विद्यापीठ प्रशासन, तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली असून, तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी अभाविपने विद्यापीठ प्रांगणात रुग्णवाहिका नेऊन आजारी पडलेल्या प्रशासनाला उपचार देण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलन केले.

विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे काम प्रशासन करीत राहिले, तर अभाविप यापेक्षा अधिक तीव— स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा या वेळी प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला. विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन थांबवणार नाही, तोपर्यंत अभाविप सदैव विद्यार्थ्यांसोबत एक ठाम भूमिका घेऊन उभी राहील, असे आश्वासन पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिले. तर, विविध मागण्यांसाठी युवक क्रांती दल आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने परीक्षा संचालकांना घेराव घालण्यात आला.

या वेळी युवक क्रांती दल पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे म्हणाला, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. गुरुवारी त्यांनी चर्चेसाठी बोलविले आहे. तसेच परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या आठवड्यात परीक्षा मंडळ व विद्या परिषदेची पूनर्परीक्षा घेण्याबाबत बैठक घेऊ, असे लेखी आश्वासन दिले आहे. आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अध्यक्ष ओंकार शरद बेनके म्हणाला, की विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून डावलण्याचे काम चालू आहे, विद्यापीठाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांना एक शेवटची संधी म्हणून पुनर्परीक्षा घ्यावी आणि विद्यार्थांना न्याय मिळवून द्यावा.

नोडल ऑफिसरची नेमणूक करावी
विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे परीक्षा विभागाच्या विरोधात आंदोलन सुरू होते. याची माहिती मिळताच चंद्रकांत पाटील यांनी तातडीने दखल घेऊन पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला आणि पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत तातडीने नोडल ऑफिसरची नेमणूक करावी, असे निर्देश दिले.

निकालाबाबत संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. आजपर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये उत्तीर्णांची टक्केवारी नुसतीच समाधानकारक नाही, तर लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते. यामुळे पुनर्परीक्षा घेणे व्यवहार्य नाही. परंतु विद्यार्थ्यांना त्वरित पुनःश्च संधी देण्याच्या दृष्टीने आगामी परीक्षा साधारण डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून आयोजित केल्या जातील. डॉ. अनिल लोखंडे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
– डॉ. महेश काकडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Back to top button