पुणे : पीएमपी अधिकारी भेटणार प्रवाशांना | पुढारी

पुणे : पीएमपी अधिकारी भेटणार प्रवाशांना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीतून प्रवास करताना प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. त्या थेट कोणापाशी मांडायच्या, कुठे जायचे, कोणाला भेटायचे, हे मात्र प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे पीएमपीच्या महाव्यवस्थापकांनी प्रवाशांशीच थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दर महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी पीएमपीचे महाव्यवस्थापक सुबोध मेडशीकर यांना प्रवाशांनी पीएमपीच्या मुख्यालयात असलेल्या त्यांच्या कार्यालयात त्यांच्याशी संपर्क साधावा आणि प्रवासादरम्यान येणार्‍या विविध समस्या त्यांच्या समोर मांडाव्यात.

त्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात येणार असल्याचे मेडशीकर यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले. या वेळी पीएमपी प्रवासी मंचचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असतील, असे ते म्हणाले. अनेकदा बसमध्ये चालक-वाहकाशी वाद होणे, गाडी वेळेत न येणे, थांब्यावर न थांबणे, गाडीतील एसी बंद असणे, वाहकाकडून सुट्टे पैसे परत न देणे, गाडीमध्ये होणारी गैरसोय, गाडीच्या अस्वच्छतेसंदर्भातील तक्रारी कुठे करायच्या, याची माहिती प्रवाशांना नसते. तसेच, टोल फ्री क्रमांकावर कॉल करून अनेकदा दखल घेतली जात नाही. त्यामुळे पीएमपीचे महाव्यवस्थापक आता थेट प्रवाशांना भेटणार आहेत. आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

या आहेत पीएमपीच्या तक्रार निवारण सुविधा
पीएमपीकडून प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 020-24545454 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त प्रवाशांना फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमावरील खात्यावरदेखील प्रवाशांना तक्रार करता येत आहे.

पीएमपीच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येता कामा नये, याकरिता मी स्वत: दर महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी प्रवाशांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या सोडविणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बससंदर्भात कोणतीही समस्या असेल, तर दर महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी प्रवाशांनी पीएमपी मुख्यालयातील माझ्या कार्यालयात येऊन थेट भेटावे. तत्काळ समस्यांचे निवारण केले जाईल.
                                                                   – सुबोध मेडशीकर,
                                                       महाव्यवस्थापक, पीएमपीएमएल

Back to top button