साखर उद्योगात संशोधनासाठी गुंतवणूक आवश्यक : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार | पुढारी

साखर उद्योगात संशोधनासाठी गुंतवणूक आवश्यक : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साखर उद्योगात संशोधन आणि विकास हा नियमित कामाचा भाग असून भविष्याचा वेध घेऊन हे काम चालू राहिले पाहिजे. मात्र, अर्थसंकल्पात संशोधनासाठी तरतूद होत नाही. साखर धंद्यामध्ये संशोधनासाठी गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली नाही तर भविष्यात अडचणीत येतील. म्हणून संशोधनासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केली. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) हॉटेल जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे आयोजित दोन दिवसीय वार्षिक साखर परिषदेचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेेचे संचालक नरेंद्र मोहन, साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, उपाध्यक्ष एस. बी. भड, डीएसटीएचे कर्नाटकचे उपाध्यक्ष सोहन शिरगावकर, कल्लाप्पाण्णा आवाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांच्या हस्ते डॉ. एस. एम. पवार, एन. व्ही. थेटे, सी.जी. माने, डॉ.डी.एम. रासकर, ओ. बी. सरदेशपांडे आणि सी.एन. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच गुजरात येथील गणदेवी साखर खांड उद्योग लि., कर्नाटकमधील उगार शुगर वर्क्स लि. आणि महाराष्ट्रातील जवाहर सहकारी साखर कारखाना-कोल्हापूर या तीन साखर कारखान्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी प्रभाकर कोरे, मोहनराव कदम, जयंत पाटील, नवीनभाई पटेल आणि प्रशांत परिचारक यांना यंदाचा साखर उदयोग गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोहनराव कदम यांच्यावतीने त्यांचे बंधू रघुनाथराव कदम यांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

पवार पुढे म्हणाले, साखर उद्योगाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. अगदी मान्सूनपासून दुष्काळ, पूर, कीड, भारनियमन, हमीभाव आदींचा समावेश आहे. त्यासाठी या क्षेत्रातील संशोधनाला अधिक चालना देण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी संशोधनावर बंधने असता कामा नये. संशोधनातून नुकसान होत असेल तर त्यास मान्यता देऊ नका. मात्र, पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी कमी पाण्यावर येणारे वाण संशोधनास प्रोत्साहन दयायाला हवे. डीएसटीए ही साखर उद्योगातील 1936 मध्ये स्थापन झालेली एक अग्रणी संस्था उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांनी दूरदृष्टी ठेवून सुरु केली. साखर उद्योगाच्या तांत्रिक गरजांची पूर्तता करण्यात देशातील महत्वाच्या संस्थांमध्ये डीएसटीएचे स्थान वरचे असल्याचेही पवार म्हणाले.

यावेळी बोलताना राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, साखर व्यवसायाला सध्या सोन्याचे दिवस आले असून संपलेल्या हंगामातील एफआरपीचे 15 सप्टेंबरअखेर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर सुमारे 42 हजार 600 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. देशातून अनुदानाशिवाय सुमारे 112 लाख टन साखर निर्यात झाली असून महाराष्ट्राचा वाटा 75 लाख टन आहे. जगात साखर उत्पादनात भारत, ब्राझिल अशी क्रमवारी असून महाराष्ट्र राज्य तिसर्‍या स्थानावर आहे. चीन, रशिया, थायलंडला मागे टाकून महाराष्ट्राने उत्पादनत आघाडी घेतल्याचे ते म्हणाले. यावेळी नरेंद्र मोहन, सोहन शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत श्रीपाद गंगावती, एस. बी. भड यांनी आभार मानले.

Back to top button