पुणे : माझे असेसमेंट चुकीचे, हे सुप्रियाने सिद्ध केले: शरद पवार यांचे वक्तव्य | पुढारी

पुणे : माझे असेसमेंट चुकीचे, हे सुप्रियाने सिद्ध केले: शरद पवार यांचे वक्तव्य

पुणे : ‘सुप्रिया राजकारणात पडेल, असे मला वाटत नव्हते. हे मी तीस वर्षांपूर्वी बोललो होतो. आता तुम्ही पाहताय ती राजकारणात आली. एका बापाचे असेसमेंट चुकीचे कसे आहे, हे आज माझ्या मुलीनेच सिद्ध केले,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
पुणे डॉक्टर असोसिएशनच्या ‘सिंगल डॉक्टर फॅमिली’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली, त्या वेळी पवार बोलत होते.

या वेळी एक मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार्‍या दोनशे डॉक्टर दाम्पत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. शरद पवार म्हणाले, ‘माझ्या कुटुंबातील सर्व संस्कारांचे श्रेय आईला आहे. पिढीत सगळेच उच्चशिक्षित झाले. हे आईमुळे घडले, त्यामुळे सबंध महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा बदलला. म्हणूनच जेव्हा निर्णय घेण्याचे पद माझ्या हाती आले तेव्हा महिलांना प्राधान्य दिले.

’ 52 वर्षांपूर्वी एका मुलीवर कुटुंबनियोजन केल्यावर निवडणुकीच्या वेळी एकच मुलगी या प्रश्नाला सामोरे जावे लागले. एकच मुलगी मग अग्नी कोण देणार? याची लोकांना काळजी. परंतु, मुलगी सगळे करू शकते, हे मी त्या वेळी सांगितले आहे, असे पवार म्हणाले. विधिमंडळ, संसदेत महिला सदस्य वाढविण्यासाठी मानसिकता बदलायला हवी. आम्ही म्हणजे राजकीय प्रमुख. त्यांनी योग्य दिशा दाखवायला हवी, असे त्यांनी सांगितले.

आईच्या संयमामुळे संसार टिकला : सुप्रिया सुळे
‘माझ्या आईकडे खूप संयम आहे. त्यांच्यामुळेच बहुधा त्यांचा संसार इतका काळ टिकलाय. (मिश्कील टिप्पणी) मी आईकडून हा गुण घेतला. तर एका शब्दांत वडिलांबद्दल बोलायचे तर ते खूप स्ट्राँग आहेत.’

Back to top button