पावसाने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान; आंबेगाव तालुक्यातील विदारक चित्र | पुढारी

पावसाने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान; आंबेगाव तालुक्यातील विदारक चित्र

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले आहे. यासह विविध पिके वाहून जाणे तसेच शेतजमिनीचे देखील लाखो रुपयांचे नुकसान या पावसाने होत आहे. ओढ्यांना आलेल्या पुरामुळे पिंपळगाव खडकी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणपतराव इंदोरे यांची ओढ्यालगतची जमीन वाहून गेली. सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. महाळुंगे पडवळ येथील हिराबाई मनोहर पडवळ यांच्या मालकीची विहीर गाडली गेली आहे.

आवटेमळा येथे शेताचे बांध फुटले आहेत. साकोरे येथील शेतकरी दशरथ मोडवे यांच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले. बळीराम म्हातारबा गाडे यांच्या घरालगत असलेल्या पोटचारीच्या पाण्याने जमीन खरडून गेली. अनेक शेतकर्‍यांच्या पिकात पाणी साचले आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. पिके पिवळी पडली आहेत. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उसाच्या पिकात संपूर्ण पाणी आहे. मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची दाणादाण उडवली आहे.

महाळुंगे पडवळ येथील हिराबाई मनोहर पडवळ यांच्या गट नं. 2582 मधील 45 फूट विहीर ओढ्याला आलेल्या पुरामुळे गाडली गेली आहे. या विहिरीत 5 एचपी मोटार गाडली गेली तसेच या विहिरीतून पाणी पिण्यासाठी व जनावरांसाठी शेतीसाठी वापरले जाते. पण, आता विहीर गाडल्यामुळे सर्वच अडचणीत आले आहेत. या विहिरीवर शहाजी पडवळ व भरत पडवळ यांची 10 एकर शेती व हिराबाई मनोहर पडवळ यांची 3 एकर शेती आहे. विहीर गाडल्यामुळे सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे हिराबाई यांनी सांगितले.

Back to top button