पुणे : राजीनामा द्या, मोठे पद देऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खा. सुप्रिया सुळे यांचा टोला | पुढारी

पुणे : राजीनामा द्या, मोठे पद देऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खा. सुप्रिया सुळे यांचा टोला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, त्यांना आम्ही त्याहून मोठे पद देऊ, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खा. सुळे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी ‘लॉलीपॉप’ आंदोलन करण्यात आले, या वेळी त्या बोलत होत्या. प्रवक्ते प्रदीप देशमुख, राजू साने, प्रदीप गायकवाड, महेश शिंदे, बाळासाहेब आहेर, सरिता काळे, कार्तिक थोटे, जयश्री त्रिभुवन, धनश्री कराळे, नीता गायकवाड, राजू खांदवे, मंजुश्री गव्हाणे आदी या वेळी उपस्थित होते.

‘महाराष्ट्र को क्या मिला, लॉलीपॉप लॉलीपॉप’ अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. खा. सुळे म्हणाल्या, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्यातील सुमारे अडीच ते तीन लाख तरुणांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांता कंपनीने निश्चित केली होती.

ती कशामुळे गेली, याचे उत्तर सत्ताधार्‍यांना द्यावे लागेल. केवळ खुर्चीमध्ये बसणे आणि हार-तुरे स्वीकारणे म्हणजे सर्व काही मिळविले, असे नसते, तर त्या पदाची जबाबदारीदेखील घ्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सीरियस होण्याची गरज आहे, असा टोला खा. सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Back to top button