पुणे : विचार करण्याची पद्धत बदलायला हवी: खा. सुळे यांचे मत | पुढारी

पुणे : विचार करण्याची पद्धत बदलायला हवी: खा. सुळे यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तृतीयपंथीयांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. विचार करण्याची पद्धत बदलल्याशिवाय सामाजिक प्रश्न बदलणार नाहीत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, चित्रा वाघ, झैनब पटेल, श्रीगौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, या अगोदरच्या म्हणजे माझ्या आईची पिढी अधिक प्रगल्भ आहे. त्या पिढीने हे प्रश्न समाजात पाहिले. कदाचित हे प्रश्न सोडविण्याची त्यांच्यात ताकद नसेल, पण त्यांनी सुसंस्कृतपणे हा प्रश्न स्वीकारला आणि पुढे गेले. तुम्ही विरोधात असा किंवा सत्तेत, संवाद झालाच पाहिजे.

तामिळनाडू सरकारने दशकापूर्वीच ही चर्चा सुरू केली. त्यांनी मेल, फिमेल आणि ट्रान्स जेंडर हा शब्द ऑदरच्या जागेवर आणला. तामिळनाडूचे यामध्ये मोठे योगदान आहे. सत्ता कुणाचेही असूदेत, पण त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे. चित्रा वाघ म्हणाल्या, तृतीयपंथीयांबाबत आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या समुदायाचे प्रश्न आपण आपले प्रश्न म्हणून मांडणे गरजेचे आहे. यावेळी झैनब पटेल, श्रीगौरी सावंत, सलमा खान यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

सर्वांचा सहभाग आवश्यक…
लोकशाही प्रक्रियेत दिव्यांग तसेच तृतीयपंथीय यांचा सहभाग वाढावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. सुरुवातीच्या कालावधीत सुमारे 1300 तृतीयपंथीय मतदार होते, आता ही संख्या 4 हजारापर्यंत आहे. मतदान प्रक्रियेत या घटकाचा सहभाग वाढायला हवा. तृतीयपंथीयांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले.

 

Back to top button