पुणे : गेल्या महिनाभरात 19 हजार फुकट्यांवर रेल्वेची कारवाई | पुढारी

पुणे : गेल्या महिनाभरात 19 हजार फुकट्यांवर रेल्वेची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रेल्वेच्या पुणे विभागात ऑगस्ट महिन्यात 19 हजार 309 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 कोटी 44 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. यात 1 हजार 524 जणांना अनियमित प्रवासासाठी 8 लाख 26 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, सामान ‘बुक’ न करता घेऊन जाणार्‍या 211 जणांकडून 24 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 1 लाख 46 हजार केसेसमध्ये 10 कोटी 10 लाख 22 हजार रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. ‘रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो,’ असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button