जुन्नर : पावसाचे पाणी पोल्ट्रीत घुसले | पुढारी

जुन्नर : पावसाचे पाणी पोल्ट्रीत घुसले

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या सोमतवाडी येथे एकाने आपल्या शेतीमध्ये येणारे पावसाचे पाणी अडविण्याकरिता दगडी भिंत बांधून पाण्याची दिशा बदलली. परिणामी, पावसाचे पाणी लगतच्या एका पोल्ट्री फार्ममध्ये घुसले. त्यामुळे तेथील जिवंत कोंबड्या व इतर साहित्याचे सुमारे 13 लाखांचे नुकसान झाल्याप्रकरणी दाखल फिर्यादीनंतर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैभव नेमीचंद गांधी (रा. जुन्नर) याच्या विरोधात ऋषीकेश शिवाजी वर्पे (रा. येणेरे, ता. जुन्नर) या पोल्ट्री व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी सोमतवाडी येथे गडावरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत येते. वैभव यांची तेथे शेती असून, त्याठिकाणी पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याकरिता चरामध्ये भिंत बांधून पाणी अडविण्यात आले होते.

मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जमा झालेले पाणी लगतच्या वर्पे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसून तेथील सुमारे 6 हजार कोंबड्या मरण पावल्या, तर तेथील कोंबड्यांचे खाद्य, कूलिंग पॅड या साहित्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेत सुमारे 13 लाखांचे नुकसान झालेले असून, त्याला वैभव यांनी केलेल्या भिंतीच्या कामामुळेच नुकसान झाल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, अंमलदार प्रशांत म्हस्के करीत आहेत.

Back to top button