भिगवण पाणी योजनेवरून श्रेयवाद सुरू; भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांवर आरोप | पुढारी

भिगवण पाणी योजनेवरून श्रेयवाद सुरू; भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांवर आरोप

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: भिगवण येथील 29 कोटी खर्चाच्या जनजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. शुक्रवारी (दि. 26) ग्रामपंचायतीने ही योजना हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून झाल्याचे जाहीर करताच शनिवारी (दि. 27) राष्ट्रवादीने पलटवार करीत या योजनेचा व हर्षवर्धन पाटील आणि ग्रामपंचायतीचा काय संबंध? असा खोचक प्रश्न करून दीड वर्षापूर्वी या योजनेच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोशाध्यक्ष सचिन बोगावत व ग्रामसदस्या नीलिमा बोगावत यांनी हा आरोप करून ग्रामपंचायतीने असले खोटे बोलणे बंद करून श्रेय घेऊन लोकांची दिशाभूल करणे बंद करावे, असे म्हटले आहे. भिगवणसाठी 29 कोटी 75 लाख 32 हजार 800 रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर होताच भिगवण ग्रामपंचायतीने या योजनेचे श्रेय हर्षवर्धन पाटील व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना देत राष्ट्रवादीवर आडकाठी घालत असल्याचा आरोप केला होता. यावर शनिवारी राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेत तीव्र संताप व्यक्त केला.

जलजीवन मिशन योजनेचे अध्यक्ष तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे सदस्य दत्तात्रय भरणे व दिलीप वळसे पाटील यांच्या कमिटी बैठकीत दीड वर्षापूर्वी या योजनांना मान्यता देण्यात आली व 24 मे रोजी या योजनेला अंतिम मान्यता देऊन औपचारिक मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले, असे बोगावत यांनी सांगत पुरावे समोर मांडले. ग्रामपंचायतीत सत्ता आल्यापासून कसलेही विकासाचे काम यांना करता आले नाही. केवळ श्रेय लाटण्यावरच भर देण्यात आल्याचा घणाघात त्यांनी केला.

तालुक्यासाठी 450 कोटी
दरम्यान, भिगवणच नाही तर इंदापूर तालुक्यासाठी जिल्हा परिषदेतून 170 कोटी व शासनाच्या माध्यमातून 280 कोटी असे 450 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजना दत्तात्रय भरणे यांनी आणल्या आहेत. गावात साधा पाणी टँकर आणायचा म्हटले, तरी आमदार यांचीच सही लागते, हे विरोधकांनी विसरू नये, असे बोगावत म्हणाले.

 

Back to top button