जेजुरी : रस्ता रुंदीकरणप्रश्नी चर्चा करून मार्ग काढू : खा. सुळे | पुढारी

जेजुरी : रस्ता रुंदीकरणप्रश्नी चर्चा करून मार्ग काढू : खा. सुळे

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: नियोजित पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जेजुरी शहरात केवळ उत्तरेकडील बाजूलाच भूसंपादन करण्यात येणार आहे, हे अन्यायकारक आहे, या जेजुरीकरांच्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून यावर मार्ग काढू, असे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

संबंधित विभाग नागरिकांचे ऐकून न घेता हरकती फेटाळून लावत आहेत. त्यामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 24) खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून अन्यायग्रस्तांनी निवेदन दिले. जेजुरी शहरामध्ये सर्वेक्षण, मोजणीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मध्य भागातून दोन्ही बाजूला रुंदीकरणाच्या खुणा न करता केवळ उत्तरेकडील बाजूला रुंदीकरणाच्या खुणा करून केवळ एकाच बाजूची जागा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न असल्याने नागरिक व व्यावसायिकांत संतापाचे वातावरण निर्माण आहे.

या एकतर्फी मोजणीला रहिवाशांनी विरोध केला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान रुंदीकरण व्हावे, अशी मागणी निवेदनाद्वारे संबधित विभागाकडे करण्यात आली आहे, मात्र शासन पातळीवर समाधानकारक उत्तरे न देता टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याने शासनाविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button