पुणे जिल्ह्यात ‘लम्पी स्किन’ची साथ; सोळा जनावरे बाधित; लसीकरणासाठी नऊ पथके तयार | पुढारी

पुणे जिल्ह्यात ‘लम्पी स्किन’ची साथ; सोळा जनावरे बाधित; लसीकरणासाठी नऊ पथके तयार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात लम्पी स्किनची गुरुवारी आठ जनावरांना बाधा झाली होती; त्यात शुक्रवारी आणखी आठची भर पडल्याने ती संख्या सोळावर पोहोचली आहे. जुन्नरमधील तीन गावांमध्ये याचा प्रसार झाला आहे, तर लम्पी स्किनने बाधित झालेला एक बैल गंभीर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील मांडवे या गावी आठ जनावरांना लम्पी स्किन हा आजार झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाल्यानंतर तत्काळ एक किलोमीटरच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी पशुसंवर्धन विभागाने नऊ पथके तयार करून परिसरातील सांयकाळपर्यंत सातशे जनावरांचे लसीकरण पूर्ण केले असल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.

दरम्यान, मांडवे गावानंतर कोपरे आणि जांभूळशी गावासह वाड्यावस्त्यांवरील जनावरांना लम्पी स्किन झाल्याचे समोर आले आहे. एक बैल गंभीर असल्याचेही डॉ. विधाटे यांनी सांगितले. अहमनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात यापूर्वी जनावरे बाधित झाली आहेत. अकोले तालुक्यालगत असलेल्या जुन्नरमधील गावांमध्ये प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. या रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो. आजारामुळे जनावरे अशक्त होत आहेत.

जनावरांतील प्रादुर्भावाला असा करा प्रतिबंध…
निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत. प्रसार बाह्य किटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांवर, तसेच गोठ्यात डास, माशा, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी औषधांची फवारणी करावी, गोठा स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, साथीच्या काळात बाधित भागातील जनावरांचा निरोगी भागात प्रवेश टाळावा, गोठ्यास भेटी देणार्‍यांची संख्या मर्यादित असावी. जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी आठ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी. बाधित क्षेत्रात गाई- म्हशींची विक्री, पशू बाजारात जाणे टाळावे. बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करत असताना किंवा रोग नमुने गोळा करत असताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Back to top button