पुणे : सुरक्षा रक्षकांसाठी येणार ठेकेदार; पालिका प्रशासन लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार | पुढारी

पुणे : सुरक्षा रक्षकांसाठी येणार ठेकेदार; पालिका प्रशासन लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या विविध वास्तूंच्या सुरक्षेसाठी नवीन ठेकेदार संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालये, विविध वास्तू, मैदाने, उद्याने आदी ठिकाणी सुरक्षा पुरवण्यासाठी खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून एक हजार 640 सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. सध्या हे काम भाजपच्या एका बड्या नेत्याच्या कंपनीकडे आहे.

मात्र, या कंपनीने वर्षभरात कधीच सुरक्षा रक्षकांना वेळेवर वेतन अदा केले नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे वारंवार येतात. या कंपनीकडून पिळवणूक होत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. यामुळे ही कंपनी व त्यांची यंत्रणा नेहमीच वादात राहिली आहे. दरम्यान, या कंपनीची मुदत संपत असल्याने, नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेतून एक हजार 640 सुरक्षा रक्षक नियुक्त होणार आहेत. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सुरक्षा विभागप्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

50 टक्के जागा रिक्त
महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेत केवळ 350 कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सुरक्षा विभागाकडे एकूण 650 सुरक्षा रक्षकांच्या जागांना मान्यता असून, यापैकी 300 जागा रिक्त आहेत. तसेच जे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत, त्यापैकी काही जण आता निवृत्त होत असल्याने सुरक्षा रक्षकांची संख्या कमी होत आहे.

 

Back to top button