पुणे : पुरंदर तहसीलची इमारत धोकादायक | पुढारी

पुणे : पुरंदर तहसीलची इमारत धोकादायक

सासवड, पुढारी वृत्तसेवा : सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. या पेशवेकालीन वास्तूत पुरंदर तालुक्यातील महसूल प्रशासनाचे कामकाज चालते. परंतु, ही वास्तू डागडुजीअभावी मोडकळीस आली आहे.

तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय कामे उदा. दाखले, रेशनकार्ड, 7/12 उतारे, परवानगी अशा अनेक कामांसाठी तहसील कार्यालयात यावे लागते. मात्र, कार्यालयातील स्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तहसील कार्यालय परिसरात नागरिकांना पिण्याचे पाणी, टॉयलेटची व्यवस्था नाही.

तहसील कार्यालयाची इमारत ऐतिहासिक ठेवा आहे. त्याचे योग्य जतन करण्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे. तहसीलदार कार्यालय मोडकळीस आल्याने नवीन इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने आराखड्यानुसार दिलेल्या मंजुरीनंतर सर्व शासकीय कामे एका इमारतीमध्ये होण्यासाठी सासवड (जेजुरी नाका) येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, निधीअभावी ते रखडले आहे.

या इमारतीतील अनेक कामे अर्धवट आहेत. सासवड-सुपे रस्त्यावर जेजुरी नाक्याजवळ 4 हजार 233 चौरस मीटर जागेवर अद्ययावत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. इमारतीचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, पुढील बांधकाम निधीअभावी रखडले आहे. प्रशासकीय इमारतीचे रखडलेले काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

Back to top button