लोणी-धामणी : बिबट्याच्या वावराने ग्रामस्थ भयभीत | पुढारी

लोणी-धामणी : बिबट्याच्या वावराने ग्रामस्थ भयभीत

लोणी-धामणी : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे ढगेस्थळ (सविंदणे रस्ता) वस्तीच्या पूर्वेला बिबट्याच्या मादीचा वावर असून तिला दोन छोटे बछडेही आहेत. शेतकरी आणि गुराख्यांनी गेल्या महिन्यात अनेक वेळा या बिबट्या मादीला पाहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रानात जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे शेतकरी आपल्या शेळ्या, मेंढ्या व गुरे रानात चरायला आणतात. शेतकरी दिवसभर शेतात काम करत असतात. परंतु, बिबट्याची चाहूल लागल्यापासून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी धरणवस्ती येथे याच बिबट्याच्या मादीने एक शेळी मारल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. तसेच परिसरातील अनेक कुत्री या बिबट्याच्या मादीने फस्त केली आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने येथे तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button