भिगवण : पाठीशी घालणार्‍यांवरही कारवाई; जिल्हा परिषदेचे आयुक्त आयुष प्रसाद यांचा इशारा | पुढारी

भिगवण : पाठीशी घालणार्‍यांवरही कारवाई; जिल्हा परिषदेचे आयुक्त आयुष प्रसाद यांचा इशारा

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: भिगवण (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहावीच्या विद्यार्थिनींशी लज्जास्पद वर्तन करणार्‍या शिक्षकाला पाठीशी घालणार्‍यांवरही कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिला.
या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी कडक कारवाईच्या सूचना केल्याने या प्रकरणाची चक्रे वेगाने फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 20) आयुष प्रसाद, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी शाळेला भेट दिली.

या वेळी सरपंच तानाजी वायसे, पराग जाधव, तुषार क्षीरसागर, अमितकुमार वाघ, जावेद मुलाणी, राजेंद्र हगारे, रामभाऊ पाचांगणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आयुष प्रसाद म्हणाले की, खरात याच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली असली तरी इथे आल्यावर हा विषय आणखी गंभीर असल्याचे जाणीव झाल्याने यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमून पुढील कारवाई तत्काळ केली जाणार आहे. संबधित शिक्षकाकडून पूर्वीचा जो प्रकार झाला होता त्याबाबतही दुसरा गुन्हा दाखल करण्याबाबत विचारधीन आहे, त्याला पाठीशी घालणार्‍यांवरही कारवाई होणारच आहे.

या प्रकारानंतर शाळा व्यवस्थापन समितीवरही भरपूर प्रश्न उपस्थित झाल्याचे मत आयुष प्रसाद यांनी व्यक्त करून शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेत यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी आमदार दत्तात्रय भरणे तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनीही शाळेला भेट दिली.

Back to top button