टेमघरही भरले! खडकवासला साखळीतील सर्व धरणे फुल्ल | पुढारी

टेमघरही भरले! खडकवासला साखळीतील सर्व धरणे फुल्ल

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरण साखळीतील टेमघर धरण शुक्रवारी (दि. 19) पहाटे शंभर टक्के भरले. 3.71 टीएमसी साठवणक्षमता असलेल्या या धरणातून वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून 250 व मुख्य सांडव्यातून 100 असे 350 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेतपाठोपाठ टेमघर धरणही भरल्याने धरणसाखळीतील पाणीसाठा 29.15 टीएमसी म्हणजे शंभर टक्के झाला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.

मात्र, रिमझिम पावसामुळे चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरण खोर्‍यासह नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत टेमघरसह वरसगावमधून 4 हजार 122 व पानशेतमधून 1 हजार 954 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या तिन्ही धरणांतून सोडण्यात येत असलेले पाणी, तसेच धरण क्षेत्रातील ओढ्या-नाल्यांतील पाण्याची भर खडकवासला धरणात पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात दुपारपासून 6 हजार 848 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Back to top button