दिल्लीत उपचाराच्या नावाखाली लाच घेणा-या दोन डॉक्टरांसह 9 जणांना अटक, CBIची कारवाई

दिल्लीत उपचाराच्या नावाखाली लाच घेणा-या दोन डॉक्टरांसह 9 जणांना अटक, CBIची कारवाई
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत सीबीआयने मोठी कारवाई करत आरएमएल (डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल) रुग्णालयात सुरू असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सीबीआयने रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह एकूण 9 जणांना अटक केली आहे. आरोपी उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करत होते असा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणा-यांचाही समावेश असल्याचे समजते आहे. सीबीआयने डॉक्टर आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित डीलर्सच्या 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. सीबीआयने एफआयआरमध्ये एकूण 16 आरोपींचा उल्लेख केला आहे.

एफआयआरनुसार, आरएमएल रुग्णालयातील असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पर्वतगौडा यांना जवळपास अडीच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही लाच त्यांना युपीआयच्या माध्यमातून मिळाली होती. याशिवाय रुग्णलायातील कॅथ लॅबचा सीनिअर टेक्निकल इंचार्ज रजनीश कुमार यालाही अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने कार्डिओलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. अजय राज, नर्स शालू शर्मा, रुग्णालयातील लिपिक भुवल जैस्वाल आणि संजय कुमार गुप्ता यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी चारजण वेगवेगळ्या उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करतात. या सर्वांना सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि गुन्हेगारी कट 120बी अंतर्गत अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी पाच मॉड्यूलच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत होते. रुग्णांवर उपचाराच्या नावाने ते पैसे लाटत होते. स्टेंट आणि इतर वैद्यकीय गरजांचा पुरवठा, विशेष ब्रँडच्या स्टेंटचा पुरवठा, लॅबमध्ये वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, लाचेच्या बदल्यात रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेणे, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्याच्या नावाखाली रुग्णांकडून खंडणी वसूल केली जात होती.

सीबीआयला राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि कर्मचारी भ्रष्टाचारात सहभागी असून वेगवेगळ्या मॉड्यूलच्या आधारे भ्रष्टाचार करत असल्याची माहिती मिळाली होती. जसं की वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, डॉक्टर्सकडून त्यांचं प्रमोशन, याच्या बदल्यात कंपन्यांकडून मोठी रक्कम, गरिबांवर उपचार करण्याच्या नावाखाली क्लर्ककडून पैशांची वसुली अशा अनेक गोष्टी केल्या जात होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news