गोंदिया : प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडले; दोन महिन्यांपासून दमडीही नाही | पुढारी

गोंदिया : प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडले; दोन महिन्यांपासून दमडीही नाही

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे मार्च, एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही झाले नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून सर्वच शिक्षकांकडून आयकर कपात करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. परिणामी, वेतन दिरंगाईमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून शिक्षकांचे वेतन वेळेत अदा करावे अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांसमवेत वेतन व इतर मागण्यांच्या अनुषंगाने बुधवार (दि.८) चर्चा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये, शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन महिन्याच्या एक तारखेला अदा करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली. परंतु, या प्रणालीचा जिल्ह्यात फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.

वेतन नियमित होत नसल्याने गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज आदींवर व्याजाचा भुर्दंड बसत आहे. विम्याचे हप्ते स्थगित असल्याने शिक्षकांवर आर्थिक ओझा वाढत असल्याचे शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे व वित्त अधिकारी बोरकर यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर प्रश्न गंभीर असल्याने यावर काल मर्यादित कार्यक्रम आखला जाईल, सोबतच संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा नेते सुरेश रहांगडाले, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य शरद पटले, डी. एच. चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष होमराज बिसेन, जिल्हा मुख्य संघटक दिलीप नवखरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या विषयांवरही झाली चर्चा…

शिक्षक समिती व शिक्षणाधिकारी यांच्या भेटीत चटोपाध्याय व निवड श्रेणी सरसकट लागू करुन गोपनीय अहवाल संदर्भातील अडचण दूर करणे, सरसकट एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, पदोन्नतीने सर्व पदे प्राथमिक शिक्षकांमधून भरणे, शैक्षणिक पात्रतेनुसार पदवीधर विषय शिक्षकांचा विषय बदलणे, न्यायालयीन प्रकरने निकाली काढणे, पदोन्नती झाल्यानंतर बदली संदर्भात कार्यशाळा आयोजित करून विनंती बदली कार्यशाळा आयोजित करणे, पदवीधर विषयी शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, २०१२ मध्ये लागलेल्या पदवीधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करणे, शाळेचा विद्युत बिल भरणा ग्रामपंचायत द्वारे पंधराव्या वित्त आयोगातून करणे, शालेय पोषण आहार देयक अदा करणे, मार्च २०२४ पर्यंतची जीपीएफ पावती देणे आदी समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली

Back to top button