पुणे : मुख्यमंत्री घेणार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या घरी सहकुटुंब भोजन | पुढारी

पुणे : मुख्यमंत्री घेणार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या घरी सहकुटुंब भोजन

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब शनिवारी (दि. 20) शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या घरी भोजन घेणार असून, यामुळे आढळरावांना मिळणार्‍या पाठबळाने शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात सामील झालेल्या निष्ठावान नेते, कार्यकर्त्यांना आधार, पाठिंबा देण्यासाठी ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू केली असून, याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री आंबेगाव तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री सध्या शिंदे गटात असलेले शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांच्या लांडेवाडी येथील घरी सहकुटुंब भोजन करणार आहेत.

शिवसेनेतील फुटीमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात जरा निवांत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहणार हे नक्की झाले आहे. आढळराव-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता एकमेकांसमोर उभे टाकणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यामुळे मोठ्या चुरशीच्या होणार यात शंका नाही. महाआघाडी सरकारमध्ये शिवसेनेची प्रचंड घुसमट होत असल्याने शिंदे गट बंड करत महाआघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा शिंदे गट आपले पारंपरिक मित्र भाजपसोबत जाऊन राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले.

या दरम्यान आमदार- खासदारांसह राज्यातील अनेक बडे शिवसेना नेते- कार्यकर्तेदेखील शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. आढळराव-पाटील ही अशा बड्या नेत्यांपैकी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीत त्यांना ‘सोशल मीडिया’वर शुभेच्छा दिल्या म्हणून कोणतीही पूर्वकल्पना न देता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. या एका घटनेने राजकीय वातावरण तापल्यानंतर सारवासारव करत नजर चुकीने तशी बातमी छापण्यात आली, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

मात्र, तब्बल 17 वर्षे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून शिरूर लोकसभा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवून शिवसैनिकांना पाठबळ दिलेले आढळराव प्रचंड नाराज झाले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, पक्ष नेत्यांना भेटल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिल्याचे आढळराव यांनी जाहीरपणे सांगत अखेर शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

आपल्या राजकीय कसोटीच्या काळात आपल्या पाठीशी उभे राहणार्‍या आढळराव-पाटील यांच्या घरी सहकुटुंब भोजनाचा बेत त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखला आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने योगही जुळून आला आहे. मुख्यमंत्री भीमाशंकर येथील महादेवाच्या दर्शनासाठी येत आहेत, हे निमित्त असले तरी ते सहकुटुंब आढळराव पाटील यांच्या घरी भोजनासाठी आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये आपल्या शिंदे गटात सामील झालेल्या नेते, कार्यकर्त्यांना पाठबळ देणे, हाच मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे.

Back to top button