पिंपरी : फेटाधारी गणेशमूर्तींना अधिक मागणी | पुढारी

पिंपरी : फेटाधारी गणेशमूर्तींना अधिक मागणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यंदा फेटा घातलेल्या गणेशमूर्तींना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. एक महिन्यापूर्वीच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. सध्या कुंभारवाड्यात व कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत. काही ठराविक स्टॉल्सवर पेणच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात. या मूर्ती सुबक आणि आकर्षक असल्यामुळे भक्तांचीदेखील पसंती मिळत आहे.

दरवर्षी नागरिकांना मूर्तीमध्ये काहीतरी नावीन्य हवे असते. गणेशमूर्तीमध्ये शक्यतो डोक्यावर मुकुट असलेली मूर्ती ही कॉमन झाली आहे. फेटा ही महाराष्ट्राची ओळख आहे. फेटा घातलेल्या मूर्ती आकर्षक दिसत असल्याने नागरिकांचा खरेदीस प्रतिसाद मिळत आहे.
शहरात राजस्थानी कलाकारांनी घडविलेल्या मूर्ती विक्रीस येतात. या मूर्ती खूप स्वस्त असल्यामुळे नागरिकांचा ओढा या मूर्ती घेण्याकडे वाढला आहे. त्याचा परिणाम शहरातील स्टॉल्सवर होताना दिसून येत आहे. या मूर्ती दिसायला सुबक आणि कमी किंमतीमध्ये मिळतात. त्यामुळे या मूर्तींना जास्त मागणी आहे. साधारणत: दीड फुटापासून ते तीन फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्ती स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मूर्तींची किंमत आकारानुसार 500 रुपयांपासून 6 हजार रुपयांपर्यंत आहेत.

गेल्या काही वर्षातील गणेशमूर्तींवर चित्रपट व मालिकांचा मोठा प्रभाव होता. यंदाच्या वर्षी मात्र तसे चित्र दिसत नाही. मोदकावर, पाटावर, सिंहासनावर, हत्तीच्या सोंडेवर, मोरावर, पाळण्यात, नंदी बैलावर, पुस्तक वाचताना, स्वामी समर्थांच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात, पेशवाई, शंकर पार्वतीसमवेत, बालगणेश रूपातील अशी नानाविध रूपातील मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. यंदाचे नावीन्य म्हणजे विविधरंगी फेटा घातलेल्या गणेशमूर्ती आहेत.

Back to top button