पुणे : लष्करी सेवेत 22 वर्षे अन् पहिल्या प्रयत्नात ‘आयएएस’ | पुढारी

पुणे : लष्करी सेवेत 22 वर्षे अन् पहिल्या प्रयत्नात ‘आयएएस’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: त्यांनी 22 वर्षे लष्करात सेवा केली; पण तेवढ्यावरच न थांबता लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा चंग बांधला आणि त्यातही पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्णही झाले. आता ‘आयएएस’ झालेल्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. यानिमित्त त्यांचा खास सत्कार पुण्यात रविवारी आयोजित करण्यात आला आहे. पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृहात (घोले रस्ता) 21 ऑगस्ट रोजी सकाळी 1 वाजता हा सोहळा होणार आहे.

चाणक्य मंडल संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनिस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार होणार असल्याची माहिती राजेंद्र आवटे यांनी दिली. आंबेगाव तालुक्यातील अमोल यांनी सेना दलात 22 वर्षे सेवा बजावत लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेची स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्णही झाले. या कार्यक्रमातच त्यांच्या या निर्णयाबाबत, तसेच चिकाटीने मिळवलेल्या यशाबाबत मुलाखतही घेण्यात येणार आहे.

Back to top button