पुणे : तोतया आयकर अधिकार्‍यांना बेड्या | पुढारी

पुणे : तोतया आयकर अधिकार्‍यांना बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आयकर अधिकारी असल्याचे सांगून सराफाकडील 300 ग्रॅम सोने, 20 लाखांची रोकड असा 33 लाख 38 हजारांचा ऐवज दरोडा टाकून लुटणार्‍या 9 जणांच्या टोळीला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिस पथकाने निपाणी-गारगोटी मार्गावर सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली.

गेल्या काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा ‘स्पेशल 26’ नावाचा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात बोगस 26 जणांची टीम अधिकारी असल्याचे सांगून श्रीमंतांच्या घरावर छापा टाकून लूट करीत होती. पुण्यात असाच प्रकार सराफाच्या बाबतीत घडला आहे.

मुख्य आरोपी व्यास गुलाब यादव (वय 34, रा. जांभूळवाडी, मूळ रा. बिहार), श्याम अच्युत तोरमल (31, रा. धनकवडी),किरण कुमार नायर (रा. भोसरी), मारुती अशोक सोळंके (30), अशोक जगन्नाथ सावंत (31, दोघेही रा. माजलगाव बीड), उमेश अरुण उबाळे (24, रा. भोसरी), सुहास सुरेश थोरात (32, मूळ रा. कराड), रोहित संभाजी पाटील (23, रा. चर्‍होली, मूळ कोल्हापूर) आणि भैयासाहेब विठ्ठल मोरे (रा. चर्‍होली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात नंदकिशोर कांतीलाल वर्मा (41, रा. क्षितिज सोसायटी, जांभूळवाडी, दत्तवाडी) यांनी तक्रार दिली आहे.

नंदकिशोर वर्मा हे सराफी व्यावसायिक आहेत. मुख्य आरोपी व्यास यादव त्यांचाच व्यावसायिक मित्र होता. यादव यानेच श्याम तोरमलच्या साथीने या गुन्ह्याचा कट रचला. इन्कम टॅक्स अधिकारी भासावे, यासाठी चांगल्या कपड्यांची खरेदी केली. 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वर्मा त्यांच्या घराबाहेर यादवसोबत गप्पा मारत उभे होते. यादव वगळता उर्वरित आठ आरोपी कारमधून आले. त्यांनी इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्यावर ‘रेड’ टाकण्याची ऑर्डर आहे, असे आरोंपीनी सांगितले. त्यानुसार त्यांनी वर्मा यांना त्यांच्या लॅपटॉपवरून प्राप्तिकर बुडवल्याचे काही फॉर्म दाखविले.

घरात झडती घेऊन 20 लाख रुपये रोख आणि 30 तोळे सोन्याच्या नथी स्वतःच्या ताब्यात घेतला. तसेच वर्मा यांना चौकशीच्या बहाण्याने गाडीत बसायला सांगून कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ नेऊन सोडले. हा संपूर्ण प्रकार रात्री साडेनऊ ते मध्यरात्री सव्वापर्यंत चालला. त्यांनी लागलीच त्यांच्या सीएशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सीएला आरोपींच्या कृत्याबद्दल शंका आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

आरोपींमध्ये तिघे सॉफ्टवेअर इंजिनिअर

अटक केलेल्या आरोपींमधील तिघेजण सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भैयासाहेब मोरे, रोहित पाटील आणि शाम तोरमल हे तिघे इंजिनिअर आहेत. आरोपी मारुती सोळंके अणि अशोक सावंत हे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहेत.

सिनेस्टाईल थरार आणि अटक…

व्यास यादवकडे चौकशी केल्यानंतर आरोपी कोल्हापूरला असल्याची माहिती मिळाली. आरोपी मुरगूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देवगड-निपाणी महामार्गावर थांबल्याचे समजले. काही आरोपी त्यांना बाहेरच सापडले. त्यातील एक आरोपीला उसात पळून जाताना पकडले. दोघांनी पोलिस कर्मचार्‍याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. हर्षल शिंदे आणि शिवदत्त गायकवाड गाडीला लटकले; तर अभिजित जाधव आणि विक्रम सावंत यांनी गाडीच्या काचेवर प्रहार करून काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पकडले गेले.

Back to top button