पुणे : मुलीवर बलात्कार करणार्‍या पित्याला जन्मठेप | पुढारी

पुणे : मुलीवर बलात्कार करणार्‍या पित्याला जन्मठेप

राजगुरुनगर : अल्पवयीन असलेल्या पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम पित्याला राजगुरुनगर जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या सुनावणीनंतर पीडित मुलगी, आई तथा आरोपीची पत्नी व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. खेड तालुक्यातील एका दुर्गम गावात 8 फेब्रुवारी 2018 रोजी पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. पत्नी, दोन मुले आणि इयत्ता आठवीत शिकणारी पीडित मुलगी, अशा परिवारासह आरोपी राहात होता. दरम्यान, पत्नी, मोठा मुलगा बाहेरगावी गेलेला असताना दारूच्या नशेत रात्री वडिलांनी हे कृत्य केले होते.

याबाबत कुणाला काही सांगितल्यास मुलीला जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित मुलगी व आईच्या तक्रारीनंतर चार दिवसांनी आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली होती, तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात आहे. राजगुरुनगर सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. अ‍ॅड व्ही. एन. देशपांडे यांनी पीडितेच्या बाजूने युक्तिवाद केला. यात एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलगी, आई व डॉक्टर यांच्या साक्ष गृहीत धरून आरोपीला न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Back to top button